नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती | पुढारी

नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
प्रसूती कळा असह्य झालेल्या मुलीला घेऊन एक माता रविवारी सकाळी अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, त्या केंद्रात जबाबदार अधिकारी अथवा इतर कर्मचारीच उपस्थित नसल्याने अखेर या मातेलाच आशासेविकेच्या पद्धतीने आपल्या मुलीचे बाळंतपण करावे लागले. बाळंतपणानंतर नवजात शिशू आणि माता यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे परिसरात संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेबाबत रविवारी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे गर्भवती माता आणि नवजात शिशू यांच्या सुरक्षिततेसाठी शासन सातत्याने विविध योजना राबवत आहेत. त्यासाठी घरी प्रसूती होणार नाही म्हणून विविध लाभ देण्यात येतात. मात्र, अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अगदी याच्याविरुद्ध परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले. रविवारी सकाळी 9 च्या सुमारास यशोदाबाई त्र्यंबक आव्हाटे (बर्ड्याची वाडी) त्यांची आई सोनाबाई वाळू लचके यांच्यासह अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या. त्यावेळेस इमारतीचा दरवाजा बंद होता. आई सोनाबाई यांनी आवाज दिला असता दवाखान्यातील रुग्णासोबत असलेल्या एका लहान मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळेस आरोग्य केंद्रात कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. मुलगी यशोदा हिच्या पोटात कळा येत असल्याने आई सोनाबाई यांनी तिला स्वत: लेबर रूममध्ये घेऊन गेल्या. तेथे तिची प्रसूती केली. मुलाचे वजन इत्यादी सोपस्कार पूर्ण केले. प्रसूतीनंतर जवळपास अर्धा पाऊण तास गेल्यानंतर आरोग्य केंद्रात सेवेस असलेल्या नर्स तेथे पोहोचल्या. हा सर्व प्रकार आई सोनाबाई यांनी आपल्या घरी कळवला.

रास्ता रोकोचा इशारा : एल्गार कष्टकरी संघटनेने त्याची दखल घेतली. याबाबत तुकाराम लचके, भगवान मधे यांनी आरोग्य केंद्रास भेट दिली. आरोग्य विभागाने आपला कारभार सुधारावा यासाठी दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिलादिनी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा भगवान मधे यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button