आमदार धीरज देशमुख यांचा जय कर्नाटकचा नारा; सीमाभागात संतापाची लाट | पुढारी

आमदार धीरज देशमुख यांचा जय कर्नाटकचा नारा; सीमाभागात संतापाची लाट

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राजहंसगड येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करून भाषणाचा समारोप करताना जय शिवराय, जय महाराष्ट्र असा समारोप केला. व्यासपीठावरून ते खुर्चीकडे जात होते. पण, त्यानंतर पुन्हा त्यांनी माईककडे येऊन जय बेळगाव, जय कर्नाटक अशी घोषणा दिली.

धीरज देशमुख यांच्या या घोषणेमुळे सीमाभागात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जय कर्नाटकचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. धीरज देशमुख यांचे वडील दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सातत्याने सीमाभागातील मराठी माणसांची बाजू मांडली. त्यांनीच पुढाकार घेऊन 2004 साली महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यामुळे आमदार या नात्याने धीरज देशमुख यांनी पाठपुरावा करणे आवश्यक होते. पण, सीमावासीयांच्या भावना पायदळी तुडवून देशमुख यांनी बेळगावात येऊन जय कर्नाटक असा नारा दिला आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार राजकारण सुरू आहे. मराठी मते मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत, अशा वातावरणात महाराष्ट्रातील आमदार बेळगाव येथे येऊन जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यामळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Back to top button