नाशिक : गावठी दारुभट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका; ग्रामस्थांकडून स्वागत | पुढारी

नाशिक : गावठी दारुभट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका; ग्रामस्थांकडून स्वागत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात अवैद्य गावठी दारू भट्ट्या उद्धवस्त करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार रविवारी (दि .५) रोजी सकाळी तालुक्यातील हनुमंतपाडा व कांचने येथे धाड टाकून गावठी दारू भट्ट्या संपूर्ण साहित्यासह उद्धवस्त केल्या आहेत.

धडक कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, संबंधित विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधीक्षक शाहजी उमाप यांनी जिल्ह्यातील सर्वच अवैद्य धंद्यांवर टाच आणली आहे. त्यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी ही धडक कारवाई सुरू केली आहे. तालुक्यात बहुतांश गावांत मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारूचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या आढवड्यातच कांचने तर शनिवारी, दि.4 उमराणे परिसरात पोलीस पथकाने धाड टाकून हात भट्ट्या उध्वस्त केल्या होत्या. ही कारवाई कायम ठेवत आज रविवारी (दि .५) पुन्हा एकदा कांचने व हनुमंत पाडा गावांत जाऊन करण्यात आली. यामुळे देवळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैद्य व्यवयास करणाऱ्यांची उरात धडकी भरली असून, कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामुळे परिसरात सर्रास उघड्यावर दारू विकणाऱ्या व बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याच प्रमाणे छोट्या मोठ्या हॉटेल व राज्य मार्गावरील ढाब्यांवर देखील देशी विदेशी दारू विक्री होत असून, पान टपऱ्यांवर गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. याचाही पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button