निमोणे : सरपंचांवर अविश्वास मंजूर; सरपंचासह सहकारी सदस्य गैरहजर | पुढारी

निमोणे : सरपंचांवर अविश्वास मंजूर; सरपंचासह सहकारी सदस्य गैरहजर

निमोणे; पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील सरपंचावर दाखल केलेला अविश्वास ठराव सहा विरोध शून्य मतांनी मंजूर झाल्याची माहिती शिरूरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी सोमवंशी यांनी दिली. सुरेखा पवार या मागील दोन वर्षांपासून चिंचणी गावच्या सरपंच होत्या. ग्रामपंचायत कामकाजात मनमानी करणे, सदस्यांना विश्वासात न घेणे आदी स्वरूपाचे आरोप ठेवत उपसरपंच अनिल पवार यांच्यासह सहा सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. चिंचणी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 9 आहे; मात्र, मागील चार महिन्यांपूर्वी एक सदस्याचा मृत्यू झाल्याने ही संख्या 8 वर आली आहे.

गावचे सरपंचपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित आहे. तडजोडीच्या राजकारणात सगळ्यांनी वाटून सत्ता राबवायची हे ठरले असतानाही मावळत्या सरपंच सुरेखा पवार यांनी राजीनामा न दिल्यामुळे त्यांच्या विरोधातील असंतोष वाढत गेला. दोन वर्षे लोटली, तरी सुरेखा पवार राजीनामा देत नाही म्हटल्यावर विरोधी गटाशी संधान साधून सहा सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल केला.

शुक्रवारी (दि. 3) शिरूरचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चिंचणी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली. या वेळी सरपंच सुरेखा पवार व त्यांचे एक समर्थक गैरहजर राहिले, तर उपसरपंच अनिल पवार, परिघा पवार, आनंदा शेलार, उज्ज्वला पवार, सागर कट्टे, वंदना पवार या सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. निवडणूक प्रक्रियेमध्ये तलाठी विजय बेंडभर व ग्रामसेवक लहू जगदाळे यांनी तहसीलदार सोमवंशी यांना मदत केली.

Back to top button