मुरुम परिसरातील पाण्याची चिंता मिटली; बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा | पुढारी

मुरुम परिसरातील पाण्याची चिंता मिटली; बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा

सोमेश्वरनगर(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : मुरूम येथील निरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यात मार्च महिन्यातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या समाधानकारक पावसाने हा बंधारा पूर्णपणे भरलेला आहे. याचा फायदा बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला होणार असल्याने उन्हाळ्यात शेतीला दिलासा मिळाला आहे.

पाण्यामुळे सध्या परिसरातील शेती हिरवीगार दिसत आहे, शिवाय येणारा उन्हाळाही सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. निरा नदीवरील बंधार्‍यामुळे निंबूत, मुरूम, होळ, को-हाळे भागातील ऊस, गहू, हरभरा, चारापिके, तरकारी आणि पालेभाज्या पिकांना वेळेत पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने आणि हे पाणी जूनपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने येथील पिके ऐन उन्हाळ्यातही तरतील, अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

गतवर्षी निरा नदीला मोठा पूर आला होता. नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबमध्येही पाऊस झाला, यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. परिसरातील ओढे, नाले, विहिरी, तळी आणि इतर पाण्याचे स्त्रोत भरलेले आहेत. पाणीसाठा समाधानकारक असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही या वेळी जाणवणार नसल्याचे दिलासादायक चित्र या भागात आहे. विहिरीतील पाणीसाठा अजूनही स्थिर आहे.

पाण्यामुळे पिके येणार जोमदार
वीर धरणातही मुबलक पाणी असल्याने निरा डाव्या कालव्यातून या भागात असलेल्या ऊस पिकाला ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. उस गाळपास गेल्याने या भागात हजारो हेक्टरवर गव्हाचे पीक घेतले आहे. गव्हाला मुबलक पाणी मिळाल्याने येथील गव्हाचे पीकही जोमदार आले आहे. यामुळे उत्पन्न वाढण्याची आशा शेतकर्‍यांना असून, त्यांनी मुबलक पाण्यामुळे समाधान व्यक्त केले.

Back to top button