उगांव; पुढारी वृत्तसेवा : निफाड तालुक्यातील उगांव, शिवडी, वनसगांव, सोनेवाडी, सारोळे, खडकमाळेगांव या प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात आज (सोमवार) पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुर्योदयापर्यंत दाट धुक्याची रजई पसरली होती. ढगाळ हवामान, दाट धुके तयार झाल्यामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांची तीव्रता वाढीस लागण्याची भिती आहे. या वातावरणाने द्राक्षबागेच्या कोवळ्या फुटींवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व धोका लक्षात घेता औषधांची फवारणी करावी लागत आहे.
द्राक्ष उत्पादक भागात दोन दिवांपुर्वीही दाट धुके तयार झाले होते. आज पुन्हा दाट धुके पडले. त्यातच दमट आणि ढगाळ हवामानाने नवीनच छाटलेल्या द्राक्षबागांच्या कोवळ्या फुटीवर बुरशी निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे औषध फवारणी हाच पर्याय आहे. मात्र वातावरणातून धुके गेल्यावरच फवारणी करणे योग्य असणार आहे. कारण धुक्यामुळे दवबिंदू कोवळ्या फुटी पानांवर तयार होतात.
बाबुराव सानप, द्राक्ष उत्पादक, सोनेवाडी खुर्द, ता. निफाड