गुंतवणूक : बांधकाम क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस? | पुढारी

गुंतवणूक : बांधकाम क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस?

डॉ. वसंत पटवर्धन

शुक्रवारी 1 ऑक्टोबर 2021 रोजी शेअर बाजार बंद होताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 58,765, 17532 वर स्थिर झाले. बाजार वर जायला सध्या पूरक अशी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेचा दौरा यशस्वी झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी प्रमुख उद्योगपतींशी यशस्वी बोलणी केली आणि त्यांना भारतात गुंतवणूक करण्याबद्दल पुन्हा आवाहन केले.

अनेक बाजूंनी आर्थिक व्यवस्था सुधारत असली तरी दोन बातम्या मन व्यग्र करणार्‍या आहेत. सरकारी बँकांतून मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचे उघडकीस येत आहे. दुसर्‍या बातमीनुसार डिझेल, पेट्रोल व पेट्रोलजन्य पदार्थांचे भाव भडकत आहेत.

अनेकविध घोटाळ्यांमुळे डबघाईला आलेली दिवाण हाऊसिंग फायनान्स ही कंपनी पूर्णपणे पिरामल समूहाने आपल्या पंखाखाली घेतली आहे. पिरामल समूह आता गृहकर्जांवर जास्त लक्ष्य केंद्रित करणार आहे. बांधकाम क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येत असल्यामुळे आता रखडलेल्या खात्यातील वसुलीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कर्जासाठी द्रवता वाढेल.

सेमीकंडक्टर (चिप) ची समस्या सध्या जगात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला भारत अपवाद नाही. त्याचा परिणाम भारतात गॅजेट व वाहन उद्योगावर होत आहे. ‘चिप’च्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने वाहन व्यवसाय हळूहळू अडचणीत येत आहे. पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय कंपन्या तैवानमधील कंपन्यांबरोबर करार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

जगभरातील सेमी कंडक्टरच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन एकट्या तैवान व दक्षिण कोरियात होते. हे उत्पादन भारतात होऊ लागले, तर भारतातील सेमी कंडक्टरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल. या उत्पादनातील 30 ते 40 टक्के उत्पादन निर्यात होऊ लागले तर आपल्या निर्यातीत जास्त वाढ होईल आणि आयात निर्यातीतील विषमता कमी होईल.

इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग अ‍ॅथॉरिटी (इक्रा) या पतमानांकन संस्थेच्या पाहणीनुसार 2021-2022 मार्च या आर्थिक वर्षाअखेर देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर 9 टक्के होईल. जगातील सर्व राष्ट्रांच्या (स.रा.उ.) उत्पादनांमध्ये हा दर उच्चांकी आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वाढलेला वेग, खरीप हंगाम चांगला जाणार असल्याचे मिळत असलेले संकेत आणि सरकारी खर्चात झपाट्याने होत असलेली वाढ या तीन कारणांमुळे या दरात वाढ होत आहे.

हा दर असाच वाढत राहिला किंवा इथेच स्थिरावला तरीही आपले सकल राष्ट्रीय उत्पादन सध्याच्या दराच्या दुप्पट होईल. त्यासाठी सुमारे 6.5 वर्षे लागावीत. म्हणजेच 2027 डिसेंबरअखेर होईल. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2021 या दोन महिन्यात शेअर बाजारात 30 कंपन्यांच्या समभागांची प्राथमिक विक्री होणार आहे.

तिथे गुंतवणूक करण्यासाठी रकमा उपलब्ध व्हाव्यात म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री नाइलाजाने करावी लागणार आहे. या तीस कंपन्या भांडवल गोळा करण्यासाठी गुंतवणूकदारांसमोर जाणार आहेत. त्यातून 45 हजार कोटी रुपये मिळतील. त्यातील विक्रीची सुरुवात आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी ही कंपनी 2778 कोटी रुपयांची भाग विक्री करणार होती.

ती बुधवारी 29 सप्टेंबरला सुरू होऊन 1 ऑक्टोबरला संपली. बहुतेक भांडवल उभारणी माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) तसेच तंत्रज्ञानाधिष्ठित म्हणजे तंत्रज्ञानाच्या व्यवसायाच्या कंपन्यांकडून केली जाणार होती. याआधी सर्वात मोठी प्राथमिक समभाग विक्री ‘झोमॅटो’ या कंपनीची झाली. त्यासाठी अपेक्षेपेक्षा 38 पट मागणी आली होती. झोमॅटो बाजारातील खाद्य पदार्थांच्या वस्तू विकत घेऊन अन्य खरेदीदारांना वितरित करते.

लॉकडाऊनमुळे लोकांना घरपोच वस्तू हव्या होत्या. त्यांची आपोआपच सोय झाली. त्यामुळे अनेकांना अनायासे रोजगार मिळाला. अर्थव्यवस्थेत होत असलेली वाढ, विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय भांडवल बाजारांना मिळत असलेली पसंती आणि त्यांच्याकडून सतत केली जात असलेली गुंतवणूक या कारणांमुळे प्राथमिक समभाग विक्रीला जोरदार मागणी होती.

देशातील शस्त्रास्त आणि स्फोटके उत्पादन करणार्‍या कारखान्यांचे नियंत्रण करणारे मंडळ केंद्र सरकारने बरखास्त केले आहे. त्यामुळे या कारखान्यांचे रूपांतर कंपन्यांत झाले आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात सात नव्या सरकारी कंपन्या उदयास आल्या आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – 1) अ‍ॅम्युनिशन इंडिया लि., 2) आर्म्ड व्हेकल्स निगम लि., 3) अ‍ॅडव्हान्स वेपन अँड इक्विपमेंट इंडिया लि., 4) ट्रुप कम्फर्टस् लि., 5) यंत्र इंडिया लि., 6) इंडिया ऑप्टेल लि., 7) ग्लायडर्स इंडिया लि.

Back to top button