निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 321.15 अंक व 1282.89 अंकांची घसरण नोंदवली गेली. निफ्टी व सेन्सेक्स एकूण 1.8 टक्के व 2.14 घसरून अनुक्रमे 17532.05 अंक व 58765.58 अंकांच्या पातळीवर बंद झाले. याच आठवड्यात कच्च्या तेलाच्या भावाने आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन वर्षांचा उच्चांक गाठला.

तसेच रिझर्व्ह बँकेच्या दहा वर्षे मुदतीच्या रोख्यांचा भाव वाढण्यास सुरुवात झाली. तसेच रुपया चलनदेखील डॉलरच्या तुलनेत डळमळीत होण्यास सुरुवात झाल्याची परिणती, बाजार उच्चांकी पातळीपासून थोडा खाली येण्याइत झाली. तरीदेखील सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 60412 अंक, तर निफ्टीने 17943.5 अंकांच्या सर्वोच्च पातळीपर्यंत मजल मारली.

* रिझर्व्ह बँकेच्या दहा वर्षांच्या कालावधीच्या रोख्यांमध्ये सातत्याने वाढ सुरू. क्रुड ऑईलचे वाढते दर तसेच रुपया चलनामध्ये कमजोरीच्या पार्श्वभूमीवर. 10 वर्षे कालावधीच्या रोख्यांचा व्याजदर (बेंचमार्क यील्ड) 6.2223 टक्क्यांवरून 6.2436 टक्यांवर पोहोचला. रुपया चलन मात्र सलग चार दिवस डॉलरच्या तुलनेत कमजोर झाल्यावर अखेरच्या सत्रात 11 पैसे मजबूत होऊन 74.12 रुपये प्रतिडॉलर किमतीवर बंद झाले.

* आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव भडकले. ब्रेंट कु्रड 1.2 टक्क्यांनी वधारून 79.28 डॉलर प्रती बॅरल भावावर बंद झाले. मंगळवारच्या सत्रात ब्रेटकु्रड तब्बल 80.75 डॉलर प्रती बॅरलच्या उच्चांकी पातळीपर्यंत पोहोचले होते. ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने तेलाचे उत्पादन 4 लाख बॅरल पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागणीच्या प्रमाणात उत्पादनात तूट भासत आहे. उत्पादनाची हीच पातळी कायम राहिल्यास वर्षाअखेरपर्यंत ब्रेंट कु्रडचे भाव 90 डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचतील, असे तज्ज्ञांचे मत. यावर्षी ब्रेंट कु्रडच्या दरांमध्ये एकूण सुमारे 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

* सप्टेंबर महिन्यात ‘जीएसटी महसूल’ मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 23 टक्के वधारून 1 लाख 17 हजार कोटी झाला. मागील महिन्याचा विचार करता महसुलात 4.5 टक्क्यांची वाढ झाली. भारतातील उत्पादनाचा निर्देशांक ‘निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय’देखील सप्टेंबर महिन्यात 52.3 वरून 53.7 झाला.

* आयात आणि निर्यात यांच्यातील फरक दर्शवणारी व्यापार तूटमध्ये सप्टेंबरमध्ये वाढ. सप्टेंबर महिन्यात भारताची व्यापारतूट 13.8 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत सुमारे 9 अब्ज डॉलर्सनी वधारून 23 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. या महिन्यात 33.4 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली, तर 56.4 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली. आयातीमध्ये तब्बल 84.8 टक्क्यांची, तर निर्यातीमध्ये 21.4 टक्क्यांची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तसेच लवकरच येत असलेल्या सणसणावरांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आयातीमध्येदेखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

* टाटा ग्रुपची उपकंपनी ‘पेनाटोन फिन्व्हेस्ट आणि अक्षस्थ टेक्नोलॉजी’ ‘तेजस नेटवर्क्स’ या कंपनीवर ताबा मिळवण्यास प्रयत्नशील. 1038 कोटींच्या गुंतवणुकीद्वारे 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर तसेच बुडीत ‘एअर इंडिया’ कंपनीचा ताबादेखील टाटासन्सकडे जाण्याची शक्यता.

* ‘आदित्य बिर्ला सनलाईफ ए एमसी’च्या आयपीओला थंड प्रतिसाद. तिसर्‍या दिवसाअखेर आयपीओ 5.24 पट सब्स्क्राईब झाला. सुमारे 2768 कोटींच्या आयपीओचा किंमतपट्टा 695-712 रुपये प्रतिसमभाग ठेवण्यात आला होता. आयपीओद्वारे भांडवल बाजारात उतरणारी म्युच्युअल फंड क्षेत्रातील चौथी बडी कंपनी.

* जूनअखेर संपलेल्या तिमाहीत भारताची चालू खात्यातील शिल्लक (करंट अकाऊंट बॅलन्स) 6.5 अब्ज डॉलर्सवर एकूण जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण 0.9 टक्के आहे. यापूर्वीच्या तिमाहीत देशाने 8.1 अब्ज डॉलर्सची तूट दर्शवली होती.

* देशातील डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डमध्ये असलेल्या ऑटोडेबिट सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेचे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून देशभरात लागू. फोन, डीटीएच, ओटीट सब्स्क्रीशन यांसारख्या सुविधांवर ऑटोडेबिट चालू असल्यास ऑटो डेबिट करण्याआधी बँकेला संबंधित ग्राहकाला मेसेज पाठवून संमती घेणे बंधनकारक. ऑटोडेबिट रक्कम 5 हजारपेक्षा अधिक असल्यास संबंधित ग्राहकाला बँकेकडून ओटीपी जाणार. ग्राहकाकडून संमती मिळाल्यानंतरच खात्यातून रक्कम वजा होणार.

* दिवाळखोर ‘डीएचएफएल’ला ‘पिरामल एंटरप्राईसेस’ने 34250 कोटींना विकत घेतले. ‘डीएचएफएल’च्या कर्जदात्यांची देणी भागवली. यापुढे एकत्रित केलेल्या कंपनीचे ‘पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स’असे नाव असेल.

* ‘आधारकार्ड’च्या धार्तीवर ‘युनिक हेल्थ आयडी’ योजनेचे केंद्र सरकारकडून अनावरण. ‘आयुषमान भारत डिजिटल मिश अंतर्गत’ देशातील सर्व नागरिकांसाठी आरोग्यासंबंधी उपलब्ध करून देणे सोयीचे होणार.

* भारताची परकीय गंगाजळी 997 दशलक्ष डॉलर्सनी घटून 24 सप्टेंबरअखेर 638.646 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button