Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह | पुढारी

Nashik : बिबट्यालाही आवरला नाही द्राक्ष खाण्याचा मोह

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

नाशिकच्या आंबट गोड द्राक्षांनी अनेकांच्या जिभेवर गोडी निर्माण केली आहे. आता मानवी वस्तीत राहणारा बिबट्या देखील या द्राक्षांच्या प्रेमात पडला आहे. त्याच्या जिभेला देखील या द्राक्षांची गोडी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. बिबट्याने चक्क द्राक्षांचे दोन ते तीन घड खाल्ल्याचे आढळून आले आहे. दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे मागील वर्षापासून दोन बिबटे व दोन पिल्ले गावाच्या उत्तर बाजुस असलेल्या डोंगर परिसरात राहत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.

त्याचे झाले अस की, भाऊसाहेब पुंडलिक मोरे यांच्या शेतात द्राक्ष काढणीची तयारी सुरु आहे. नेहमी प्रमाणे त्यांचे बंधु अशोक पुंडलिक मोरे बागेतून जवळच असलेल्या परशराम बाबा यांच्या समाधीच्या पुजेसाठी जात असताना यावेळी बागेतून ओरखडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यांनी खाली बसून बघितले तर चक्क बिबट्या आपल्या पंजाने बागेच्या वेलीवर ओरखडत होता व द्राक्ष खाली पाडत होता. यावेळी मोरे यांनी जवळच असलेल्या घरामधील व्यक्तींना आवाज देताच बिबट्याने आवाज ऐकताच धुम ठोकली. जवळ जावून पाहिले तर बिबट्याने द्राक्षांचे घड खाल्ल्याचे दिसले.

दिवसाढवळ्या वावर,  पिंजरा लावण्याची मागणी 

बिबट्याने पाच सहा दिवसांपूर्वी रत्नगड जवळ राहत असलेले कचरु पवार व सुनिल गांगुर्डे यांच्या घराजवळून कुत्र्याला ओढत नेवून ठार केल्याची घटना घडली. शनिवारी मिराबाई गांगुर्डे यांनी सकाळी ८:३० वा बिबट्या घरासमोरच्या शेतातून जात असतांना बघितला. आठ दिवसापूर्वी मेंढपाळ ताराचंद ढेपले हे रात्री कांद्याच्या शेतात मुक्कामी होते, परिसरात असणाऱ्या बिबट्याने रात्री १:३० वाजेच्या सुमारास शेळ्या मेंढ्याच्या कळपात घुसुन हल्ला केला.  मेढ्यांच्या आवाजाने ढेपले हे जागे झाले व कोकरु ठार करुन बिबट्याने बोकड पकल्याचे दिसले. बोकड वाचवण्यासाठी ढेपले यांनी आरडाओरडा केला  त्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.

परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी दहशतीत असून पिंजरा लावण्याची मागणी शिंदवड ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button