सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दहावी, बारावीचे विद्यार्थी अडकले महामार्गावर | पुढारी

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दहावी, बारावीचे विद्यार्थी अडकले महामार्गावर

कराड : पुढारी वृत्तसेवा मलकापूर (ता. कराड) येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) सकाळी कराडनजीक महामार्गावर सुमारे चार ते पाच किलोमीटरहून अधिक वाहनांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. सकाळपासून सुरू झालेल्या या वाहतूक कोंडीत दहावी व बारावी परीक्षा देणारे विद्यार्थी अडकल्याने पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम मागील महिन्यापासून सुरू झाले आहे. कराड व मलकापूर येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याचे काम जवळपास 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. तर मलकापूर येथील कृष्णा हॉस्पिटलसमोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी गुरूवारपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करून वाहतूक सेवा मार्गावरून वळवण्यात आली आहे.

मुळात अरुंद असलेल्या सेवा रस्त्यावर डीपी जैन या ठेकेदार कंपनीकडून पूल पाडण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. त्यामुळे कसेबसे एक अथवा दोन वाहन जाऊ शकते. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी होणे अपेक्षितच होते. त्यामुळेच महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्यात येऊन या मार्गावरून वाहतूक वळवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे आज पाहावयास मिळाले.

दहावी व इयत्ता बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा यापूर्वीच सुरू झाली आहे. परीक्षेला निघालेले विद्यार्थी महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडले. अशात वाहतूक संथ गतीने पुढे सरकत असल्‍याने विद्यार्थ्यांनी पायी चालत जाणे पसंद केले. मात्र ग्रामीण भागातील तसेच कराड शहरालगतच्या परिसरातील विविध गावच्या विद्यार्थ्यांचे या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड हाल झाले.

यापूर्वी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र प्रशासन आणि ठेकेदार कंपनीने उपाययोजनांकडे कानाडोळा केल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक, विद्यार्थी तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा : 

Back to top button