नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी | पुढारी

नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा

खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून जाताना अडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने तब्बल आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस कार्यक्षेत्रामध्ये खून केल्याचा आरोप असलेल्या मधुकर विजय माळी (रा. मालेगाव) या आरोपीला निफाडच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने 7 जानेवारी 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर पोलिस शिपाई दीपक लोंढे यांनी माळी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माळीने लोंढे यांच्या पायावर लाथ मारून त्यांना जायबंदी केले आणि पलायनाचा प्रयत्न केला. परंतु अन्य पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले.

तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांना अटकाव करणे आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यास मारहाण करणे आदी कलमांखाली आरोपपत्र सादर केले होते. सहा वर्षांच्या कालावधीनंतर या खटल्याचा निकाल लागलेला असून निफाड येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश पवार यांनी माळीला अनुक्रमे पाच वर्षे, दोन वर्षे आणि एक वर्ष सक्तमजुरी तसेच आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील म्हणून ॲड. बंगले यांनी कामकाज बघितले.

हेही वाचा :

Back to top button