नगर : शेतकर्‍यांसाठी अर्थ सहाय्य धोरण तत्काळ जाहीर करा ; विधानसभेत आ. थोरात यांनी सरकारला धरले धारेवर | पुढारी

नगर : शेतकर्‍यांसाठी अर्थ सहाय्य धोरण तत्काळ जाहीर करा ; विधानसभेत आ. थोरात यांनी सरकारला धरले धारेवर

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोयाबीन, कापूस, भाजीपाल्यास कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ज्या- ज्यावेळी शेतकरी अडचणी आला. त्यावेळी सरकारने मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शेतकरी अडचणीत असल्याने सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याबाबतचे स्पष्ट धोरण लवकर जाहीर करावे, अशी मागणी माजी कृषीमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. मुंबईत विधान भवनात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आ. थोरात म्हणाले, नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.

कांदा पिकासाठी शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे, मात्र कांद्याला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. त्यामुळे विधान सभेतील सदस्यांनी सरकारला केलेल्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने एक समिती गठित केली आहे, मात्र या समितीमध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी शेतकर्‍यांचा अथवा व्यापार्‍यांचा एकही प्रतिनिधी घेण्यात आलेला नाही. या समितीने शासनाला अहवाल कधी सादर करायचा आहे, याबाबतची स्पष्टता नसल्याचे आ. थोरात यांनी ठणकावून सांगितले.

सध्या राज्यातील शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे. ज्या- ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला आहे. त्या- त्या वेळी राज्य सरकारने शेतकर्‍याला मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचा आत्तापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आतासुद्धा राज्यातील शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आला आहे. त्यामुळे सरकारने कोणतेही कारण न सांगता तातडीने शेतकर्‍यांसाठी मदतीचे स्पष्टपणे धोरण जाहीर करावे, अशी मागणी आ. थोरात यांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करुन, सरकारला धारेवर धरले आहे.

नाफेडने कांदा खरेदी नेमकी कोठे सुरू केली..?
राज्य सरकारने शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला कांदा नाफेडमार्फत खरेदी
सुरू केली असल्याबाबतची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र, नाफेडने ही कांदा खरेदी नेमकी कोठे सुरू केली आहे, हे कुणालाही कळण्यास तयार नसल्याचे सांगत काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Back to top button