नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

नाशिक : पंधरा हजारांची लाच घेताना सहायक निबंधक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

येथील सहायक निबंधकास 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 2) दुपारी रंगेहाथ पकडले. एकनाथ प्रताप पाटील असे संशयित लाचखोर सहायक निबंधकाचे नाव आहे.

एकनाथ पाटीलने पाथरे येथील साईलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत कामास असलेल्या तक्रारदाराकडे पतसंस्थेतील थकित कर्जदारांना कर्जवसुलीची नोटीस बजावणीसाठी कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात एका नोटिसीचे 1500 रुपये असे एकूण 25 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी (दि. 2) त्यापैकी 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक संदीप साळुंके, सहायक फौजदार सुखदेव मुरकुटे, हवालदार पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सहायक निबंधक वादाच्या भोवर्‍यात

महिनाभरापूर्वीच सहायक निबंधक कार्यालयाच्या कारभाराबाबत एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेत जिल्हा निबंधकांच्या आदेशाने चौकशीही झाली होती. सहायक निबंधक पाटील व अन्य कर्मचार्‍यांना वरिष्ठांनी तंबी दिली होती. मात्र, विविध कामांसाठी पतसंस्थांकडून पैसे उकळण्याचे काम सुरूच होते, हे या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button