

भारताच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमध्ये रेल्वेमार्ग टाकण्याच्या योजनेवर चीन जोरदार काम करत आहे. हा रेल्वेमार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होऊन वायव्येकडील नेपाळ सीमेपर्यंत जाईल. दुसर्या बाजूला तो अक्साई चीमधून जाईल आणि शिनजियांग प्रांतातील होटन येथे संपेल. हा मार्ग अक्साई चीनच्या रोटोग आणि पेंगाँग तलावाजवळून जाणार आहे. यातून चीनला दोन उद्दिष्टे पूर्ण करायची आहेत. एकीकडे, सीमावर्ती भागांचे एकत्रीकरण करून सीमा सुरक्षा वाढवायची आहे, तसेच गरज पडल्यास सीमेवर वेगाने सैन्य जमा करण्याची क्षमता विकसित करायची आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.
अमेरिकेने चीनचा स्पाय बलून उद्ध्वस्त केल्यापासून चीन चांगलाच संतापला आहे. अमेरिका, कॅनडा आणि इतर पाश्चिमात्य देश चीनविरुद्ध आगपाखड करत असल्याने ड्रॅगन खवळला आहे. दुसरीकडे भारतानेही चीनच्या कुरापतखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार सामरिक सज्जता केल्यामुळे ड्रॅगन हैराण झाला आहे. सर्व बाजूंनी तीव— प्रतिक्रिया आल्याने अस्वस्थ झालेला चीन चौफेर आक्रमक पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण चिनी समुद्रातील बेटांच्या वादानंतर पुन्हा एकदा भारताच्या अक्साई चीनच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. आपल्या विस्तारवादी धोरणाचा एक भाग म्हणून आता भारताच्या सीमेला लागून असलेल्या एलएसीजवळील तिबेट प्रदेशात रेल्वेमार्ग टाकण्याच्या योजनेवर चीन जोरदार काम करत आहे. हा रेल्वेमार्ग भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. मागील काळात अक्साई चीनमधून जाणारा शिनजियांग-तिबेट महामार्ग हा भारत आणि चीन यांच्यातील तणावाचे कारण ठरला होता आणि त्यानंतर 1962 मध्ये त्यावरून युद्ध झाले होते. तिबेटच्या विकास आणि सुधारणा आयोगाने रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना उघड केली आहे. त्याअंतर्गत या रेल्वे नेटवर्कचा विस्तार सध्याच्या 1400 कि.मी.वरून 2025 पर्यंत 4 हजार कि.मी. आणि 2035 पर्यंत 5 हजार कि.मी.पर्यंत करण्यात येणार आहे.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारत आणि नेपाळच्या सीमेजवळून हे मार्ग जाणार आहेत. चीनचा प्रस्तावित रेल्वे मार्ग तिबेटमधील शिगात्से येथून सुरू होऊन वायव्येकडील नेपाळ सीमेपर्यंत जाईल. दुसर्या बाजूला तो अक्साई चीनमधून जाईल आणि शिनजियांग प्रांतातील होटन येथे संपेल. हा रेल्वे मार्ग चीनच्या हद्दीतील अक्साई चीनच्या रोटोग आणि पेंगाँग तलावाजवळून जाणार आहे. चीनला रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारून दोन उद्दिष्टे पूर्ण करायची आहेत. एकीकडे, चीनला सीमावर्ती भागांचे एकत्रीकरण करून सीमा सुरक्षा वाढवायची आहे, तसेच गरज पडल्यास सीमेवर वेगाने सैन्य जमा करण्याची क्षमता विकसित करायची आहे. दुसरीकडे तिबेटच्या आर्थिक एकात्मतेला गती द्यायची आहे.
अक्साई चीनचा हा भाग तिबेट पठाराच्या वायव्येस, कुनलुन पर्वताच्या अगदी खाली आहे. ऐतिहासिकद़ृष्ट्या हा भाग भारताला मध्य आशियाशी जोडणार्या रेशीम मार्गाचा एक भाग होता. शेकडो वर्षांपासून मध्य आशिया आणि भारत यांच्यातील संस्कृती, व्यवसाय आणि भाषेचे माध्यम म्हणून या भागाचे महत्त्व राहिले आहे. अक्साई चीन हे सुमारे 5 हजार मीटर उंचीवर असलेले मिठाचे वाळवंट आहे. त्याचे क्षेत्रफळ 42 हजार 685 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र निर्जन आहे. येथे कायमस्वरूपी वसाहती नाहीत. चीनने 1950 च्या दशकात अक्साई चीनच्या क्षेत्रावर कब्जा केला होता. भारत या विषयावर बराच काळ अनभिज्ञ राहिला. 1957 मध्ये भारताला कळले की, चीनने या भागात रस्तेबांधणीही सुरू केली आहे. याची माहिती मिळताच भारताने तत्काळ याचा कडाडून निषेध केला.
भारताच्या निषेधानंतर या क्षेत्राबाबत दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू झाला. पुढे या वादाचे रूपांतर युद्धातही झाले जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला. या भागात बांधलेला रस्ता चीनने 1958 मध्ये पहिल्यांदा आपल्या नकाशात दाखवला होता. भारताच्या निषेधाच्या विरोधात ही चिनी दादागिरी होती. आता चीन पुन्हा एकदा दादागिरी दाखवत असून भारत यावेळी पूर्णपणे सतर्क झाला आहे. सीमेवर गेल्या 33 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोंडीदरम्यान मानसिक दबाव निर्माण करण्याचा डाव म्हणूनही चीनच्या या पावलाकडे पाहिले जात आहे. चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही आपल्या सीमा मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. चीनच्या सीमेजवळील सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या भागातही भारत रेल्वेमार्गांचा विकास करत आहे.
चार प्रस्तावित रेल्वेमार्गांद्वारे सीमावर्ती भागात भारतीय रेल्वेची उपस्थिती नोंदविली जाणार आहे. त्यापैकी तीन ईशान्येला आणि एक उत्तरेला आहे. हा रेल्वेमार्ग भारतीय रेल्वे नेटवर्कला 1352 कि.मी.पर्यंत नेणारा ठरेल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास तो चीनच्या किंघाई-तिबेट मार्गाला मागे टाकत हा जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग बनेल. भारतातर्फे अरुणाचलमध्येही रस्ते आणि पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. सियांग येथील क्लास-70 पूल हा भारताच्या संरक्षणसज्जतेचा एक भाग आहे. या पुलावरून 70 टन वजनाची लष्करी उपकरणे सीमावर्ती भागात सहज नेता येतात. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या महिन्यातच या पुलाचे उद्घाटन केले होते. गेल्या दोन वर्षांत सीमाभागात 200 हून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. दुसरीकडे, भारतीय हवाई दलाने सातत्याने आपली ताकद प्रचंड वाढवली आहे. भारतीय हवाई दलाकडे आज सर्व प्रकारची लढाऊ विमाने आहेत.
अलीकडेच बंगळूर येथे झालेल्या एअर शोमध्ये भारतीय लष्कराने हवाई क्षेत्रातील कौशल्य आणि क्षमता दाखवून दिली आहे. संरक्षण व्यवस्था बळकट करूनच आपण चीनच्या आव्हानांना तोंड देऊ शकतो. संरक्षण क्षेत्रात आपण स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहोत. सीमेवर शांतता राखण्यासाठी भारताला प्रचंड सामरिक सामर्थ्याची गरज असून त्या दिशेने आपली पावले पडताहेत. आजचा भारत हा 1962 चा भारत नसून 2023 चा भारत आहे याची चीनला जाणीव आहे. त्यामुळेच चीन भारताशी प्रत्यक्ष युद्ध करण्याच्या मनःस्थितीत नाही. त्याऐवजी 'सायकालॉजिकल वॉरफेअर'चा पर्याय चीनने अवलंबला आहे.
– हेमंत महाजन, ब्रिगेडिअर (निवृत्त)