नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड | पुढारी

नाशिक : तारण दागिने सोडविण्याच्या नावाखाली फसविणारा ठकसेन गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तारण दागिने सोडवण्यासाठी पैशांची मागणी करीत गंडा घालणाऱ्या संशयितास खंडणीविरोधी पथकाने गोल्फ क्लब मैदानाजवळून ताब्यात घेतले. प्रथमेश ऊर्फ गुच्छा श्याम पाटील (२५, रा. जुने नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पंचवटी व गंगापूर पोलिसांत फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

संशयित प्रथमेशच्या मोबाइलमध्ये बजाज फायनान्सकडे २ लाख रुपयांचे सोने तारण ठेवल्याची एक पावती आहे. गोल्ड लोनची पावती दाखवून त्यावर मला किती लोन देऊ शकाल, अशी विचारणा संशयित खासगी वित्तसंस्थेच्या प्रतिनिधींना करायचा. त्यांनी २ लाखांपेक्षा जादाची रक्कम सांगितल्यानंतर गहाण साेने सोडवून आणण्यासाठी संबंधितांकडून २ लाख रुपये घ्यायचा व संबंधित अधिकाऱ्यास वित्तसंस्थेच्या कार्यालयाजवळ न्यायचा. तेथून रोकड घेऊन प्रथमेश फरार होत असल्याचे दोन प्रकार उघडकीस आले होते. या दोन्ही प्रकरणांत पंचवटी व गंगापूर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिस अंमलदार भगवान जाधव यांना संशयित प्रथमेश हा गोल्फ क्लब मैदान परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने परिसरात सापळा रचला आणि संशयित प्रथमेश पाटील यास ताब्यात घेतले. पोलिस चौकशीमध्ये त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. प्रथमेश याचा ताबा गंगापूर पोलिसांकडे दिला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सगळे, रोकडे, राजेंद्र भदाणे, चकोर, स्वप्निल जुंद्रे, भगवान जाधव, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, सविता कदम यांच्या पथकाने कामगिरी केली.

मौजमजेवर उधळले पैसे
संशयित प्रथमेश याने अवघ्या एका आठवड्यात असे गंडा घालण्याचे दोन प्रकार करीत चार लाखांची फसवणूक केली. मात्र, या गुन्ह्यातील एक रुपयाही त्याच्याकडे शिल्लक नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. मौजमजेवर त्याने चार लाखांची रोकड उडवून टाकल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले.

हेही वाचा :

Back to top button