धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार | पुढारी

धुळे : नामपूर-साक्री रस्त्यावर अपघातात प्राथमिक शिक्षक ठार

धुळे (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा

खालचे टेंबे ते नामपूर रस्त्यावर अज्ञात दुचाकीच्या धडकेत द्याने (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी प्राथमिक शिक्षक प्रशांत निंबाजी ठाकरे (45) हे ठार झाले. रविवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कापडणीस हे पत्नी विद्या कापडणीस यांच्यासमवेत रविवारी खालचे टेंभे येथे नातेवाइकाकडे दुचाकीने गेले होते. रात्री नामपूरकडे परत येत असताना फाट्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना ठोस दिली. विद्या या बाजूला फेकल्या गेल्या, तर प्रशांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पप्पू धोंडगे, लोटन धोंडगे यांनी अपघातग्रस्तांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रशांत यांना मृत घोषित केले. विद्या यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. प्रशांत कापडणीस हे कोटबेल येथील जिल्हा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय मॉडेल स्कूलमध्ये कार्यरत होते. सोमवारी मूळगावी द्याने येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

Back to top button