नगर : दरोडेखोरांची टोळी केली गजाआड | पुढारी

नगर : दरोडेखोरांची टोळी केली गजाआड

बोटा : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस 8 ठाणे हद्दीत सशत्र दरोडा टाकणारी आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी एअरगन, धारदार कोयता, मोबाईल, दुचाकी सह एकूण 2 लाख 81 हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमालासह घारगाव पोलिसांनी कुख्यात पाच दरोडेखोर जेरबंद केले आहे. परशुराम आप्पा मोरे (वय 22 रा. शेवगाव), सचिन दगडू कासार (वय 21, पाथर्डी), सलमान अहमद पठाण (वय 19, पाथर्डी), मुकुंद असलकर (वय 20, पाथर्डी) तसेच एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

तालुक्यातील पठार भागात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून पुणे ते नाशिक प्रवास करणारे दुचाकीस्वार किशोर बाळकृष्ण राऊत (रा. नाशिक) हे आपल्या दुकाचाकी क्रमांक एम एच 15 सी डब्लू 3682 वरून आपल्या राहत्या घरी नाशिकला जात असताना शनिवार (दि. 25)रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास माळवाडी, बोटा शिवारातील साकुर ढाब्याजवळ आले असताना पाठीमागून तीन मोटर सायकलवर स्वार होत सहा दरोडेखोरांनी यांना अडविले. ’तू आमच्या अंगावर का थुंकला’ म्हणून मारहाण केली. तसेच पिस्टलचा धाक दाखवत पाकीट काढून घेतले. यामध्ये रोख रक्कमेसह इतर कागदपत्रे होते. याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी घारगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. संतोष खेडकर यांनी पथक तयार केले.या पथकाने जलद गतीने चक्रे फिरविली. गुप्त बातमीदाराकडून या कुख्यात दरोडेखोरांची गुप्त माहिती मिळाली. या माहिती नुसार पोलिसांनी घारगाव परिसरात सापळा लावून पाच आंतरराजीय दरोडेखोरांना गजाआड केले. त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता. त्यांनी गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 81 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, धारदार कोयता, एअर गन, दोन मोटरसायकल, आठ मोबाईल तर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडे पोलिस चौकशी करीत आहेत.

आरोपींवर अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल
अटक असलेल्या चार जणांनी अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव, सुपा, पाथर्डी आणि पुणे जिल्ह्यातील खेड, चाकण, शिक्रापूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. परशुराम मोरे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत.

Back to top button