नाशिक : सहा महिन्यांतच प्रसूती, जन्मत:च वजन ८४० ग्रॅम ; डॉक्टरांच्या प्रयत्नाने ... | पुढारी

नाशिक : सहा महिन्यांतच प्रसूती, जन्मत:च वजन ८४० ग्रॅम ; डॉक्टरांच्या प्रयत्नाने ...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डॉक्टरांना देव म्हटले जाते याची पुन्हा एकदा प्रचिती आली. साडेसहा महिन्यांतच झालेल्या प्रसूतीमुळे अवघ्या ८४० ग्रॅम वजनाची चिमुकली जन्मास आली. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. अशात डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या चिमुकलीला जीवदान दिले. ६१ दिवसांनी जेव्हा या चिमुकलीला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा तिचे वजन १ किलो ८१५ ग्रॅम म्हणजेच ९७५ ग्रॅमने वाढल्याचे दिसून आले.

सिन्नर तालुक्यातील शिवडे येथील एक गर्भवती महिला साफल्य रेनबो रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. साडेसहा महिन्यांतच तिने एका चिमुरडीला जन्म दिला. अकाली प्रसूतीमुळे बाळाचे वजन खूपच कमी भरले. अवघे ८४० ग्रॅम वजन असल्याने, बाळाची प्रकृती स्थिर ठेवण्याबरोबरच ती सुदृढ करण्याचे डॉक्टरांसमोर आव्हान निर्माण झाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल मुरकुटे यांनी अथक प्रयत्नाने बाळावर उपचार केले. जन्मत:च बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवावे लागल्याने, डॉ. मुरकुटे आणि त्यांच्या टीमने बाळावर विशेष लक्ष दिले.

आश्चर्य म्हणजे उपचाराचे परिणाम पहिल्या दिवसापासून दिसून आल्याने, बाळाचे वजन वाढण्याची प्रक्रियाही वेगाने घडत गेली. अवघ्या ६१ दिवसांत बाळाचे वजन ९७५ ग्रॅमने वाढले. सध्या बाळाची प्रकृती उत्तम असून, शुक्रवारी (दि.२४) बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी बाळाचे नातेवाइकांनी डॉ. मुरकुटे यांच्यासह संपूर्ण टीमचे आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button