पाथर्डी : निष्ठा असणार्‍यांचाच विजय व्हावा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे | पुढारी

पाथर्डी : निष्ठा असणार्‍यांचाच विजय व्हावा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या काळात ही भूमी गद्दारांची नाही, तर निष्ठावंताची म्हणून ओळखली जावी, अशीच प्रार्थना आई जगदंबेच्या चरणी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची व धर्माशी निष्ठा असणार्‍यांचाच विजय झाला पाहिजे, अशी भावना व्यक्त करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली.

दानवे यांनी शुक्रवारी (दि.24) पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर येऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, जिल्हा उपप्रमुख राजू नांगरे, तालुका प्रमुख भगवान दराडे, बाळासाहेब सानप, मंगल म्हस्के, राजेंद्र म्हस्के, महादेव रहाटे, उद्धव दुसूंगे आदी उपस्थित होते.

दानवे म्हणाले, मी व्यक्तिगत कोणाबद्दल बोलत नाही. कोणा एका व्यक्तीशी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राशी निष्ठावंत असणार्‍यांना येणार्‍या काळात विजय मिळू दे. शिवसेना पक्षाचे चिन्ह गेले तरी काही फरक पडत नाही. आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा लढा सुरूच राहील.

पुण्यातील विधानसभेच्या दोन्ही जागा आमच्याच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोहटा देवस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकार सुरेश भणगे, भीमराव खाडे यांनी दानवे यांचा सत्कार केला. पाथर्डी शहरात महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, अविनाश मगरे आदी उपस्थित होते.

Back to top button