पुणे : चांदणी चौक परिसरात पाच तास वाहतूक कोंडी | पुढारी

पुणे : चांदणी चौक परिसरात पाच तास वाहतूक कोंडी

पौड रोड : पुढारी वृतसेवा :  चांदणी चौकात महामार्गावर शुक्रवारी सकाळी क्रेन, बस, मालवाहू ट्रेलरचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे सकाळी सातपासून ते दुपारी बारापर्यंत परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबई, भूगावकडे जाणार्‍या वाहनचालक, प्रवाशी व नागरिकांचे मोठे हाल झाले. कोथरूड डेपोकडून बावधनकडे जाणार्‍या मार्गावरील चढावर अवजड ट्रेलर बंद पडल्याने वाहनांच्या भुसारी कॉलनीपर्यंत रांग लागल्या होत्या. त्यातच क्रेन, पीएमपी बस व शिवसाई बसदेखील बंद पडल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

चांदणी चौकाच्या ब्रिजखाली काम चालू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला. त्यात वारजेकडून येणारी अनेक वाहने वेदभवनकडून येत असताना या पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी होत असते. महामार्गाचे काम आणि रस्त्यावरील बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने नागरिक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. पौड फाटा वाहतूक विभागाने महामार्गावरील नादुरुस्त वाहने हटवत दुपारी बारा वाजता वाहतूक सुरळीत केली. पौड फाटा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू शिंदे म्हणाले की, वाहतूक कोंडीबाबत माहिती मिळताच तातडीने पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठविले. त्यांनी काही तासांत वाहतूक सुरळीत केली.

Back to top button