पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त | पुढारी

पिंपळनेर : बिबट्याने केली गाय फस्त

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बोदगाव-चिंचपाडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत गायीचा वन विभागाने पंचनामा केला असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वनविभागाचे कर्मचारी रोशन काकुस्ते यांनी पंचनामा केला असून, बोदगाव येथील सरपंच काशीनाथ पवार, आदिवासी बचाव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सूर्यवंशी, नाना भोई, श्रीराम मैंदाणे, गायकवाड, ज्योतिराम भोई, गणेश गावित, योगेश भारुड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.  ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यास माहिती देताना सांगितले की, परिसरात दोन बिबट्यांचा वावर असून, एका मादीची दोन पिल्ले आहेत. त्यामुळे वारंवार जनावरे फस्त करण्याच्या घटना घडतात. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होत असून, त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. बोरगाव, चिंचपाडा, आमोडे, कालदर ढवळीविहीर, भोणगाव ही गावे आणि शेती क्षेत्रातील शेतकरी धास्तावले आहेत. बोदगाव येथील देवीदास गजमल भारुड यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नुकतीच घडल्याने मृत गायीचा पंचनामा वनविभागाने केला आहे. तसेच तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

Back to top button