नगर : युतीतील निधी वाटपाचे गणित अखेर जुळले ! मुख्यमंत्र्यांनीच केली मध्यस्थी | पुढारी

नगर : युतीतील निधी वाटपाचे गणित अखेर जुळले ! मुख्यमंत्र्यांनीच केली मध्यस्थी

नगर : पुढारी वृत्तसेवा : युतीमध्ये ठरल्याप्रमाणे 60-40 चे पालन होत नसल्याने संतप्त खासदार सदाशिव लोखंडे यांनी गत आठवड्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा नियोजनवर राग काढला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीत आले असता, खा. लोखंडे यांनी त्यांचे याप्रश्नी लक्ष वेधले, त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. यामुळे निधी वाटपाचे गणित जुळल्याची भावना शिंदे समर्थकांनी व्यक्त केली.

खा. लोखंडे यांनी जलजीवन योजना तसेच अन्य विकास कामांच्या बाबतीत गत आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्यासह सर्वच प्रशासनाला फैलावर घेतल्याचे पहायला मिळाले होते. यावेळी लोखंडे समर्थकांनीही उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच जिल्हा नियोजनच्या कामांबाबतही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नगरमध्ये खा. लोखंडेंसह शिंदे गटात नाराजीची भावना होती.
शिर्डीतील महसूल परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता, त्या ठिकाणी खासदार लोखंडे व शिवसैनिकांनी त्यांची भेट घेत निधी मिळत नसल्याचा सूर आळवला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. मंत्री विखेंनेही यावेळी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे शिंदे गटालाही 40 टक्क्के निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. दरम्यान, काल गुरुवारी खासदार लोखंडे यांनी झेडपीत जावून अधिकार्‍यांना काही कामेही सुचिवली आहेत.

Back to top button