नगर : विखे-थोरात-कर्डिलेंची सहमती एक्स्प्रेस विरोधकांचे मजूर फेडरेशनचे गणित हुकले | पुढारी

नगर : विखे-थोरात-कर्डिलेंची सहमती एक्स्प्रेस विरोधकांचे मजूर फेडरेशनचे गणित हुकले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्त्ताधारी गटाला 11, तर विरोधकांना 9 जागा मिळाल्याने अध्यक्ष पदाच्या निवडीकडे लक्ष लागले होते. काल गुरुवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अर्जुन बोरुडे व विकी जगताप यांनी प्रशांत गायकवाड व रामचंद्र राळेभात यांचा 10 विरोधात 8 असा पराभव करत पुन्हा सत्ता स्थापन केली. दरम्यान, जिल्हा फेडरेशनमध्ये विखे-थोरात-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस धावल्याने विरोधकांना मॅजिक फिगर गाठता आली नाही. मजूर फेडरेशनच्या 20 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक झाली. यात सत्त्ताधारी बोरूडे गटाला 11, तर विरोधी प्रशांत सबाजीराव गायकवाड यांच्या गटाला 9 जागा मिळाल्याने अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले होते. विरोधी गायकवाड यांच्या गळाला एक सदस्य लागला तरी सत्तेचे पारडे फिरू शकते, त्यात विरोधी गटाला बारामतीची रसद असल्याचेही बोलले जात होते.

त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. काल गुरुवारी संघाच्या कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रत्नाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी 20 सदस्यांपैकी 18 सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष पदासाठी अर्जुन बोरुडे, तर उपाध्यक्ष पदासाठी विकास जगताप यांनी अर्ज भरले. विरोधी परिवर्तन पॅनेलच्या वतीने अध्यक्ष पदासाठी प्रशांत गायकवाड व उपाध्यक्ष पदासाठी रामचंद्र राळेभात यांनी अर्ज भरला. गुप्त निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात अर्जुन बोरुडे, विकास जगताप यांना प्रत्येकी दहा, तर प्रशांत गायकवाड, रामचंद्र राळेभात यांना आठ-आठ मते पडली. त्यामुळे पाचव्यांदा अर्जुन बोरुडे हे अध्यक्ष, तर विकास जगताप हे दुसर्‍यांदा उपाध्यक्ष झाले.

निवडणूक अधिकारी यांना सहकारी संजय बनसोडे व अल्ताफ शेख, विशाल अळकुटे यांनी सहकार्य केले, संघाचे सचिव विठ्ठल सांगळे, मॅनेजर प्रकाश कराळे, पर्यवेक्षक तुकाराम बोरुडे लिपिक ज्ञानेश्वर हजारे, शिवाजी खेंडके, पंडित बोरुडे, प्रशांत पिंपळे आदी उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकार पॅनलचे समर्थक यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. नुतन पदाधिकारी यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, खा.सुजय विखेपाटील, आमदार प्रा.राम शिंदे यांनी अभिनंदन केले, तर आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी फेटे बांधून नुतन पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले.

कोण-कोण हजर, कोण गैरहजर!
मतदान प्रक्रियेत अर्जुनराव बोरुडे, विकास जगताप, प्रशांत गायकवाड, नामदेवराव ढोकणे, लीलावती युवराज लाळगे, रामचंद्र राळेभात, राजू फकीर, बाळासाहेब सोनवणे, शंकर गायकवाड, उत्तमराव घोगरे, नानासाहेब कानवडे, सुशांत गजे, प्रकाश सदाफुले, विद्या विनायक काळे, रुख्मिणी गुलाबराव कराळे, प्रकाश बोरुडे, किशोर गायकवाड हे संचालक हजर होते. तर विजय गायकवाड आणि तान्हाजी गायकवाड हे दोन संचालक गैरहजर होते. हे दोन्ही संचालक एक सत्ताधारी तर एक विरोधी गटाचे आहेत.

Back to top button