नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा | पुढारी

नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट... प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उड्डाणपुलावरून दुचाकीस प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावरूनच वाहने चालवत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. उड्डाणपुलावरून जाणार्‍या वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातात दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांसह दुचाकीचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, या उद्देशाने गरवारे बसस्टॉप ते आडगावपर्यंत सुमारे 16 किमी लांबीचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे शहरात न शिरता अवजड वाहने अवघ्या 10 ते 15 मिनिटांत शहराबाहेर जातात. उड्डाणपुलावरून कार व अवजड वाहने भरधाव जात असल्याने दुचाकीस्वारांना धोका आहे. हे ओळखून उड्डाणपुलावरून जाण्यास दुचाकी वाहनधारकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याकडे दुचाकीचालक दुर्लक्ष करीत आहेत. उड्डाणपुलाच्या सुरुवातीस फलक लावून दुचाकीधारकांना सूचना दिली जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तसेच शहर वाहतूक शाखेकडूनही ठोस कारवाई होत नसल्याने दुचाकीस्वार सर्रास उड्डाणपुलावरून वाहने चालवत आहेत.

त्यामुळे भरधाव वाहनांच्या धडकेत किंवा नादुरुस्त वाहनांवर आदळून दुचाकीस्वारांचा मृत्यू किंवा जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उड्डाणपुलावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नसल्याचेही चित्र आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहनांसह पसार होत असल्याने जखमी व्यक्तींना तातडीने मदत मिळण्यास अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

 

हेही वाचा:

Back to top button