नगर : वांबोरीचे पाणी ‘टेल टू हेड’ देणार आ.प्राजक्त तनपुरेंचे आश्वासन | पुढारी

नगर : वांबोरीचे पाणी 'टेल टू हेड' देणार आ.प्राजक्त तनपुरेंचे आश्वासन

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : वांबोरी चारीच्या वीज बिल भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्नांचे फलित झाले आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वीज बिलासाठी दीड लाखाची रक्कम जमा केल्याने वांबोरी चारी सुरू होणार आहे. वांबोरी चारी सुरू होण्यासाठी आता कोणतीही अडचण राहिलेली नाही, असे सांगत चारी सुरू झाल्यास शेतकर्‍यांना टेल टू हेड पाणी देण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे आश्वासन आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिले. राहुरी तालुक्यातील वांबोरी चारीबाबत आ. तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आ. तनपुरे यांनी सांगितले की, वांबोरी चारीचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज बील जोडणी व्हावी,यासाठी शासकीय पातळीवर अतोनात प्रयत्न केले. परंतु वांबोरी चारी सुरू होऊ नये म्हणून अधिकार्‍यांवर कोणाचा दबाव होता हे समजेनासे झाले होते. वांबोरी चारीला टेल टू हेड पाणी पुरवठा हेच माझे कर्तव्य मानत कार्य केले. मागिल तीन वर्षांपासून वांबोरी चारीद्वारे मुबलक पाणी पुरवठा केला. महाविकास आघाडी शासनाची सत्ता असताना वांबोरी, कात्रड, गुंजाळे यासह नगर व पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी गावांना पाण्याबाबत न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. निसर्गासह महाविकास आघाडी शासनाची मोठी साथ लाभली. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे सहकार्य महत्वाचे ठरले. पावसाने थांबा घेतल्यानंतर सातवड, तिसगाव, करंजी या टेल पर्यंत असलेल्या क्षेत्रापर्यंत पाणी देण्यात यश आले, असे यावेळी आ. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

श्रेयासाठी नव्हे तर शेतकर्‍यांच्या हितासाठी
वांबोरी चारी सुरू होण्यासाठी अधिकार्‍यांनी नकारात्मकता दर्शविली, परंतु वांबोरी चारीचा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. परतीच्या मुदतीवर पैसे जमा केलेले आहे. सत्तेचा लाभ घेत विरोधक श्रेय घेणार आहे. मला त्याची तमा नसून, वांबोरी चारी सुरू होऊन शेतकर्‍यांना पाणी मिळेल, ही माझ्यासाठी समाधानात्मक बाब असल्याचे आ. तनपुरे यांनी ठणकावून सांगितले.

Back to top button