जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच | पुढारी

जळगाव : पोलिस होण्याचं तरुणाचे स्वप्न अपूर्णच

जामनेर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सध्या पोलिस विभागात रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. पुणे येथे पोलिस भरतीसाठी गेलेल्या पहूर (ता. जामनेर) येथील तरुणाचं पोलिस होण्याचं अपूर्णच राहिलं आहे. मैदानावरच अस्वस्थ वाटू लागल्याने घरी परतताना प्रकृती अधिकच बिघडल्याने उपचारादरम्यान रोशन बहिरू पवार (२०) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे भरतीप्रकिया सुरू असताना मैदानावरच अचानक रोशनची तब्येत बिघडली. पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेऊन उपचार केले. भरतीप्रकिया आटोपून रात्रीच्या रेल्वेने पुण्याहून भुसावळ येथे सकाळी पाचला पोहोचण्याअगोदर घरी फोन करून तब्येत चांगली नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे भुसावळ येथे नातेवाइकांकडे उपचार करण्यात आले. माहिती मिळताच आई, वडील, भाऊ यांनी भुसावळ येथून जामनेर येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पुन्हा अस्वस्थ वाटत असल्याने जामनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान रोशनचा मृत्यू झाला.

वडिलांचा आक्रोश..
बहिरू पवार यांना तीन मुले असून, मुलाचे पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याचे सांगत वडिलांनी आक्रोश केला. मनमिळाऊ व हुशार तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले असून, गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा:

Back to top button