नाशिक : पर्यटकांसह साई भाविकांची सर्रास लूट : गृहखात्याचे दुर्लक्ष | पुढारी

नाशिक : पर्यटकांसह साई भाविकांची सर्रास लूट : गृहखात्याचे दुर्लक्ष

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

शिर्डीदर्शनासह पर्यटनावर निघालेल्या साईभक्तांची अडवणूक करण्याचे सत्र महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी आरंभले असून नाशिक सापुतारा महामार्गावर कागदपत्र तपासणीच्या नावाखाली मुंबई गुजरातसह परराज्यांतून येणा-या वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा आहे.

नाशिक सापुतारासह बोरगांव सुरत हे महामार्ग तालुक्यातून जातात. त्यामुळे महामार्ग पोलिसांची नेमकी जबाबदारी काय याबाबत सुरगाणा तालुकावासियांना नेहमीच उत्सुकता राहिली आहे. जेव्हा जेव्हा रस्ते अपघात घडले तेव्हा तेव्हा स्थानिक पोलिसच मदतीसाठी तेथे हजर होत असतात. महामार्ग पोलिस फक्त हफ्ता गोळा करण्यासाठीच असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. महामार्गावरून धावणाऱ्या प्रवासी व अवघड वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबवायचे व कागदपत्रांच्या नावाखाली वाहनचालकाची अडवणूक करायची. राजीखुशीने प्रकरण मिटले  तर ठीक नाहीतर वाहनधारकाच्या नावाने पावती फाडायची. अशीच काहीशी कार्यपद्धती या पथकाची राहिली आहे. नाशिक सापुतारा महामार्ग नेहमीच साईभक्तांच्या वर्दळीने व्यापलेला असतो. गुजरात राजस्थानसह साईभक्तांच्या या मार्गावर राबता असतो. वर्षभर गुजरातसह असंख्य पालख्याही शिर्डीकडे जात असतात. शिवाय सापुतारा हे पर्यटन स्थळ असल्याने रहदारीचा ओघ सर्वाधिक आहे. परिस्थितीत महामार्ग सुरक्षा पोलिसांकडून कारवाईचा बडगा साईभक्तांसह अन्य वाहनधारकांवर उगारला जात आहे. महाराष्ट्र गुजरात सिमेवर असलेल्या ठाणापाडा वाघदेवाजवळ या ठिकाणी सुरक्षा पथकातील कर्मचारी ठाण मांडून रुबाबात अक्षरशः लूटमार करत आहेत. दिवसाढवळ्या महामार्ग पोलिसांकडून होणारी लूट बघून भाविकांना महाराष्ट्रापेक्षा बिहार चांगला वाटू लागतो. गुजरातच्या हद्दीतून नाशिककडून येणाऱ्या- जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शिर्डी दरम्यान कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली अनेक ठिकाणी पोलिसांकडून लुटण्यात येते. यामुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. साईदर्शनासाठी आलेले भाविक व माल वाहतूक करणारे चालक या पोलिसांच्या गळी पडत आहेत. शिर्डीतून शिंगणापूर व अन्य ठिकाणासाठी अवैध वाहतूक करणारे नियमित ग्राहक आहेत. विशेष म्हणजे याच मार्गावरून अनेक गुजरातचे व्हीआयपी मंत्री, अधिकारी शिर्डीला जात येत असतात. तरीही बिनदिक्कतपणे भाविकांची लूटमार अखंड सुरू आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकालाही ही लूट अजिबात दिसत नाही. या मार्गावरून प्रवास करण्याचे शुल्क देण्यास वाहन चालकांनी नकार दिल्यास अनेकदा त्यांना पोलिसांच्या शिवीगाळ व मारहाणीचाही प्रसाद मिळतो. एखादा विरोधक आलाच तर त्याला काढून दिले जाते. एकवेळ भाविक बाबांच्या पेटीत दक्षिणा टाकण्याचे टाळू शकतो. मात्र, या खाकी वर्दीतील दरोडेखोरांना बिदागी दिल्याशिवाय सुरक्षित व विना अपमानित झाल्याशिवाय पुढे जावू शकत नाही. रस्त्याच्या कडेला कुटुंबासह पोलिसांना विनंती करणारे भाविक व वाहनचालक असे हृदयद्रावक दृश्य नित्याचेच आहे. राज्यातील नागरिकांबरोबरच परराज्यातील वाहनचालकांवर होणारा हा सुलतानी जाच तसेच राज्याची व पोलीस दलाची प्रतिमा खराब करणारा हा लुटमारीचा धंदा बंद करावा, यासाठी भाविक साकडे घालत आहेत.

हेही वाचा:

Back to top button