नाशिक : हंगामाला सुरुवात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत | पुढारी

नाशिक : हंगामाला सुरुवात मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा
द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीला दमदार सुरुवात झाली असून 1,880 कंटेनरमधून 24 हजार 765 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणार्‍या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला यंदा 2 जानेवारी सुरुवात झाली असून अजूनही अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

नाशिकमध्ये यंदा द्राक्षपिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे 45 हजार 964 द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तयार होणार्‍या मालाचे प्रमाण वाढत असल्याने गेल्या तीन – चार आठवड्यांपासून निर्यातक्षम आणि लोकल मार्केटच्या सर्वच द्राक्षांचे दर आठवड्याला चार ते पाच रुपये किलोने कमी होत आहेत, अशीच परिस्थिती जर राहिली, तर मार्चच्या पंधरवड्यापर्यंत दर वाढण्याची परिस्थिती वाटत नाही. द्राक्षांची आवक वाढत आहे, त्याचप्रमाणे थंडीचीदेखील लाट सध्या सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष विक्रीवर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळेदेखील दर कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. द्राक्षाचे हे दर असेच टिकले पाहिजे किंबहुना या दरात वाढ झाली, तरच शेतकर्‍यांना दोन पैसे शिल्लक राहू शकतात अन्यथा वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकर्‍यांना द्राक्षपीक परवडणारे नाही असे मत सुप्रसिद्ध कृषितज्ज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी बोलताना व्यक्त केले.

या देशात होते निर्यात
पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. नाशिकची द्राक्षे नेदरलँड, ब्रिटन, जर्मनी, लॅटविया, डेन्मार्क, स्वीडन, पोर्तुगाल, स्विझर्लंड, पोलंड, बेल्जियम, फिनलेंड, इटली, स्पेन आदी देशांत पाठविण्यात येतात.

द्राक्ष निर्यातीसाठी पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे
* किसान रेलद्वारे वाहतूक सबसिडी सुरू व्हावी
* रेलद्वारे वेळेत द्राक्ष पोहोचविण्यासाठी उपाययोजना हव्यात
* निफाड रेल्वेस्थानकातून द्राक्षाचेलोडिंग अनलोडिंग सुरू व्हावे
* बांगलादेश बॉर्डरपर्यंत माल पोहोचविण्याची व्यवस्था व्हावी
* नेपाळ राष्ट्रामध्ये रेलद्वारे द्राक्ष निर्यातीची सुविधा सुरू व्हावी

द्राक्ष निर्यात आलेख
2017/18 1,88,221 मेट्रिक टन 1900 कोटी
2018/19 2,46,133 मेट्रिक टन 2335 कोटी
2019/20 1,93,690 मेट्रिक टन 2177 कोटी
2020/21 2,46,107 मेट्रिक टन 2298 कोटी
2021/22 2,63,075 मेट्रिक टन 2302 कोटी

हेही वाचा:

Back to top button