बारामती : यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर, कर्णबधिरांना हक्काचा रोजगार | पुढारी

बारामती : यशवंतराव चव्हाण सेंटर देणार मूकबधिर, कर्णबधिरांना हक्काचा रोजगार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण सेंटर मूकबधिर आणि कर्णबधिरांना हक्काचा रोजगार मिळवून देणार आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या सहकार्याने अशा व्यक्तींना नोकर्‍या उपलब्ध करून देणार असून, त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हा निर्णय घेतला आहे. लवकरच रिलायन्स स्मार्ट बाजार आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअर्समध्ये अशा व्यक्ती नोकर्‍या करताना दिसतील, अशी माहिती खासदार सुळे यांनी दिली.

त्यांच्या कल्पनेला रिलायन्स रिटेल लिमिटेडने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअरच्या संयुक्त विद्यमाने हे संपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील औंध, वाकड, हिंजवडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, गायकवाडनगर, पाषाण, फातिमानगर, मांजरी, कल्याणीनगर, बी. टी. कवडे, वाघोली, खराडी, चाकण, आळंदी, मोशी, एरंडवणे, वारजे, नर्‍हे या ठिकाणच्या रिलायन्स स्टोअर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

इच्छुकांनी अर्ज केल्यानंतर योग्य उमेदवार निवडून त्यांना पुण्यातील रिलायन्स स्मार्ट बाजार, रिलायन्स स्मार्ट स्टोअर्समध्ये ट्रेनी कस्टमर सर्व्हिस असोसिएटपदी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी शिक्षणाची बारावी पास ही अट ठेवली आहे. त्याचबरोबर मुलाखतीदरम्यान 12 वी पास प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. बारावी पास इच्छुकांनी आपली नावे यशवंतराव चव्हाण सेंटरकडे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.

Back to top button