नाशिक : जिल्ह्यात तीन नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात तीन नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये 25 आरोग्य उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रशासकीय मान्यता आदेश नुकताच राष्ट्रीय अभियानचे आयुक्त धीरज कुमार यांनी पारित केला आहे. त्यामुळे या उपकेंद्रांबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी 13 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रे तयार करणे. या उपकेंद्रांसाठी 15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत असलेल्या लेखाशीर्षामध्ये 13 कोटी 87 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये हे उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. त्यामध्ये नाशिकचा समावेश असून जिल्ह्यातील चांदवड, कळवण आणि दिंडोरी तालुक्यात प्रत्येकी 1 उपकेंद्र उभारणार आहे. यासाठीचा खर्च हा 15 व्या वित्त आयोगातून केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. नाशिक, नंदुरबार आणि यवतमाळ प्रत्येकी 3, सातारा, अहमदनगर, अकोला आणि वाशिम प्रत्येकी 2, तर रायगड, रत्नागिरी, पुणे, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूर प्रत्येकी 1 अशा 25 उपकेंद्रांचा समावेश आहे.

देशातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी या उपकेंद्राचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागात उपकेंद्र असल्याने दरवेळी इलाज करण्यासाठी शहरात जावे लागणार नाही, तर ग्रामीण भागात तत्काळ उपचार केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यामुळे ही आरोग्य उपकेंद्रे मंजूर झाली आहेत. – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री.

हेही वाचा:

Back to top button