Marilyn Monroe : जगाला वेड लावणार्‍या ’सौंदर्यवती’ची रहस्यमय कथा

Marilyn Monroe : जगाला वेड लावणार्‍या ’सौंदर्यवती’ची रहस्यमय कथा
Published on
Updated on

हॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री आणि मादक सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी मर्लिन मन्रो (Marilyn Monroe) हिच्यावर मागील वर्षी बायोपिक येऊन गेला. त्यांचं नाव होतं – 'ब्लॉन्ड.' या बायोपिकमध्ये हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अ‍ॅना डे अरमस हिने मर्लिनची भूमिका साकारली होती. मर्लिनचे सौंदर्य वाखाणण्याजोगे होते. डाव्या गालावरील काळ्या रंगाचा ब्युटी मार्क मर्लिनच्या सौंदर्यात आणखी भर टाकायचा. मादक डोळे, चकाकणार्‍या कुरळ्या केसांमुळे मर्लिनचे सौंदर्य आणखी बहरायचे; पण हे ग्लॅमर फार काळ टिकू शकलं नाही. खूप कमी वयात तिचा मृत्यू झाला. प्रचंड ग्लॅमर, आजूबाजूला माणसांची गर्दी, विलासी जगणं आणि अनेक अफेअर्स… शेवटी गूढ मृत्यू… अशी एक हॉलीवूडची तारका मर्लिन जिच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडू शकले नाही. तिने आत्महत्या केली, असे म्हटले जाते. काही जण तिचा खून झाल्याचे म्हणतात; पण या गोष्टी कधीच उलगडू शकल्या नाहीत.

मर्लिन मन्रोचा जन्म 1 जून, 1926 रोजी झाला. औषधांची अधिक मात्रा घेतल्याने 5 ऑगस्ट, 1962 रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा जन्म आणि बालपण लॉस एंजेलिसमध्ये गेले. मर्लिनला अनेकांकडून प्रेम मिळालं; पण तिचं दु:ख न कुणी समजलं, न कुणी तिचा आधार बनलं. सौंदर्य, ग्लॅमर, प्रेम आणि कमी वयात ओढावलेला मृत्यू, यादरम्यान तिच्या जीवनातील काळी बाजू कुणालाच दिसली नाही, असे म्हणायला हरकत नाही. तिचं नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ते गायक फ्रँक सिनात्रा आणि बेसबॉल खेळाडू जे. डिमॅगियोशीही जोडलं गेलं होतं. मन्रोने अनेक लग्नं केली, ती सगळी अयशस्वी ठरली.

अनेक सवयी, बिनधास्त वागणं आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये खेचल्या गेलेल्या मर्लिनच्या आयुष्याची खरी आयुष्याची कहाणी कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावी. चरित्र लिहिणार्‍यांनी तिच्या ग्लॅमरस जीवनाची दुसरी बाजू दाखवली. तिने लिहिलेली पत्रे, कविता आणि रोजनिशी, चित्रपटांचे कॉन्ट्रॅक्ट असे अनेक दस्तावेज 'फ्रॅगमेंटस् : पोएम्स, इंटिमेट नोटस्, लेटर्स बाय मर्लिन मन्रोे' नावानं छापण्यात आले. तारुण्यात अनेक पुरुषांशी संबंध, शोषणाचे किस्से आणि प्रेमासाठी व्याकुळ झालेल्या मर्लिनचा संदिग्ध मृत्यू जगजाहीर आहे. काही पत्रे, पुस्तकांतून खासगी जीवन सार्वजनिक झाल्याने तिच्या आयुष्यातील अनेक पैलू बाहेर आले.

अभिनेत्री म्हणून जगताना ग्लॅमर, चित्रपट, चर्चा आणि बरंच काही अवतीभोवती असतानाही कधी कधी माणसांची गर्दी तिला सहन होत नसे. अभिनेत्री असल्यामुळेच ती आपल्या मनातील गोष्टी कदाचित सार्वजनिकपणे व्यक्त करू शकली नसावी. म्हणूनच तिनं आपल्या लिखाणाचा आधार घेऊन ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला.

मर्लिनचं मुळचं नाव नौरमा जीन बेकर. मर्लिन नावाच्या पुस्तकात नार्मन मेलर म्हणतो – 'एकीकडे अवैधता आणि दुसरीकडे वंशागत विक्षिप्ततेचा इतिहास. तिच्या आजोबांनी आपले शेवटचे आयुष्य मनोरुग्णांच्या इस्पितळात घालवले. तिची आजी अतिशय सुंदर होती. तीदेखील मृत्यूआधी मनोरुग्णांच्या इस्पितळात होती. तिच्या आईच्या आयुष्यातील अधिक काळ मनोरुग्णांसाठीच्या आश्रयस्थानात गेला होता. मर्लिनच्या एका मामाने आत्महत्या केली होती. आईला मनोरुग्ण आश्रयस्थानात नेले जायचे, तेव्हा मर्लिनला अनाथालय किंवा पोषणगृहात राहावं लागत असे.' मर्लिनच्या पूर्वायुष्यातील इतिहास तिच्या जगण्याला वेगळा अर्थ देऊ शकला, असे म्हणायला हरकत नाही. (Marilyn Monroe)

अल्पवयीन असतानाच मर्लिनला समजलं होतं की, आपल्या सौंदर्याकडे पुरुष आकर्षित होताहेत. मृत्यूच्या दोन वर्षांपूर्वी तिनं लेखक जेक रोजेन्सला सांगितलं होतं की, सुरुवातीला तिनं मॉडेलिंग केले. पुढे हतॉलीवूडमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांच्या संपर्कात ती आली. चित्रपट निर्मात्यांना जे हवंय, ते जर त्या अभिनेत्रीला मान्य नसेल तर तिची जागा घेण्यासाठी 40 जणी तयार असायच्या. तिचे अनेक चित्रपट निर्मात्यांशी संबंध आले होते. यापुढेही जाऊन तिने बि—टिश पत्रकार डब्ल्यू. जे. वैदरबीला सांगितले होते की, स्वत: आपण ठरवू शकत नाही की, कुणाशी संबंध ठेवायचे. नाही तर तुम्ही सिनेतारका कधीच होऊ शकत नाही.

मर्लिनचा जन्म सामान्य कुटुंबात झाला होता. बालपण अनाथालय आणि बालगृहात गेल्यानं तिला खूप कमी शिक्षण घेता आलं. तिच्याकडे होतं ते रूप, विलक्षण सौंदर्य. मात्र, तिच्या मानेवर सिनेतारका होण्याचं भूत बसलं होतं. त्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

अनेक अफेअर्स केल्यानंतर मर्लिन उदासीन झाली होती. ती प्रेमासाठी काहीही करायला तयार होती. तिला अनेकांनी गाडी, बंगले, विलासी चैनीचे आमिष दाखवले; पण ती कायमस्वरूपी त्या-त्या पुरुषासोबत राहायला तयार नव्हती. तिला हवं होतं ते 'प्रेम.' खरं प्रेम जे तिला आयुष्यात कधीही मिळालं नाही.

त्या दिवशी ती थोडी अस्वस्थच होती. ज्या व्यक्तीला तिनं फोन केला, ते तिचे शेवटचे बोलणे होते. त्या व्यक्तीचे नाव लाफोर्ड होते. लाफोर्डने सांगितले होते की, मर्लिनला त्यानं रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केलं होतं; पण जेव्हा त्यानं संध्याकाळी मर्लिनला फोन केला, तेव्हा ती चिडचिड करत होती. तिने जेवणासाठी येण्यास नकार दिला. ती उदास वाटत होती. तिच्या स्वरात कंप जाणवत होता.

लाफोर्डदेखील हॉलीवूडशी संबंधित होता. लाफोर्डने पुढे सांगितले- रात्री 8 वाजता पुन्हा मर्लिनला फोन केला, तेव्हाही तिने येण्यास नकार दिला. कापर्‍या आवाजात ती म्हणाली, 'प्रेसिडेंटना गुडबाय सांग आणि तुलादेखील गुडबाय.' पण, लोकांना वाटत होतं की, तो खोटी कहाणी सांगत आहे. मर्लिनला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी आणि
त्यांचे भाऊ यांच्यासोबत सातत्याने पाहिले जात होते. लाफोर्ड आणि केनेडी बंधूंचे चांगले संबंध होते.

असं म्हटलं जातं की, मर्लिनने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवलं होतं; पण काही जण म्हणतात की, हा खून होता. प्रश्न हा होता की, तिने खाल्लेल्या इतक्या झोपेच्या गोळ्या कुठून आल्या? औषधांची बाटली कुठे गायब झाली? ज्या बेडवर तिचा मृतदेह होता, त्यावरचे बेडशीट जरादेखील विस्कटलेले दिसले नाही.

असंही म्हटलं गेलं की, मर्लिनच्या किडनीमध्ये ड्रग्ज मिळाले नाहीत. तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत, तर तिला इंजेक्शन दिले गेले होते. एकूणच परिस्थिती संशयास्पद होती. लोकांनी संशयाचे बोट जॉन एफ. केनेडी यांच्याकडेही दाखवले. कारण, केनेडी आणि मर्लिनचे संबंध बिघडले होते आणि ती त्यांच्याविरोधात एक पत्रकार परिषद घेणार होती.

अनेक पत्रकारांनी तिच्या मृत्यूनंतर टेलिफोनचे रेकॉर्ड आणि अन्य माहिती शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या हाती काही लागले नाही. एका पत्रकाराला मर्लिनच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी पत्रांचे बंडल मिळाले. ही पत्रे मर्लिन आणि केनेडी बंधूंमध्ये लिहिली गेलेली होती. गुडमनने केनेडी आणि मर्लिन यांच्याभोवती फिरणारे पुस्तकही लिहिले; पण कोणत्याच प्रकाशकाने ते छापण्यास सहमती दर्शवली नाही. मर्लिनच्या आत्महत्येनंतर एक वर्षाने राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या झाली. अखेर ते पुस्तक छापण्यात आलेच. पुस्तकाचे नाव होते 'मर्लिनचा रहस्यमयी मृत्यू.'

ऋतुपर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news