Nashik Crime : हुक्का पार्लरवर छापा, दोघांना घेतले ताब्यात | पुढारी

Nashik Crime : हुक्का पार्लरवर छापा, दोघांना घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदावरी नदीच्या काठावरील हॉटेल शांती दत्त इनच्या सहाव्या मजल्यावरील कानिफ रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. याप्रकरणी मॅनेजरसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेस्टॉरंट मॅनेजर संशयित जावेद अली सत्तार अली (२२) आणि राजुल इस्लाम जमरोद्दीन (२४) यांना पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील अवैध धंद्यांसह अमली पदार्थ विक्री, वापर आणि साठा करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक नेमले आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार गणेश वडजे यांना कानिफ रेस्टॉरंटमधील हुक्का पार्टीबाबत माहिती मिळाली. पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांनी सापळा रचत अंमलदार गणेश भामरे, रंजन बेंडाळे, भारत डंबाळे, नितीन भालेराव, बाळा नांद्रे, अनिरुद्ध येवले, भाउसाहेब कुटे, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, महिला अंमलदार अर्चना भड यांच्या पथकाने रेस्टॉरंटमध्ये धाड टाकली. त्यावेळी आठ ग्राहक हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच हुक्का विक्री करणारे संशयित जावेद आणि राजुल यांनाही अटक केली. रेस्टॉरंटमधून पथकाने हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर, व इतर साहित्य असा एकूण ६५ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button