४९९ अपयशांनंतर मिळवले यश! | पुढारी

४९९ अपयशांनंतर मिळवले यश!

एक दिवस एडिसनचे सर्व सहकारी एकवटले आणि त्यांनी एडिसनला सांगितले, साहेब आता बस्स झाले….! आतापर्यंत आपण 499 प्रयोग केले; पण जराही यश आले नाही. तेव्हा आम्हाला वाटते की, हा प्रयोग सोडून द्यावा आणि दुसर्‍या एखाद्या कार्यात लक्ष गुंतवावे. तुम्ही रोज नव्या उत्साहाने येता, कामाला लागता आणि निराश होऊन घरी जाता! आपण कदाचित निराश झाला, तरी निरुत्साही होत नसाल; पण आम्ही मात्र थकलो आहोत.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा पण भन्नाट माणूस. अपयश एकदा येऊ दे की हजारदा; परंतु संशोधन करताना शेकडो प्रयत्नांती अपयश आले, तरी नाऊमेद न होता तो अधिक जोमाने त्याच प्रयोगाची सुरुवात करीत असे. असाच एक महाअवघड शोध लावण्यासाठी एडिसन रात्रीचा दिवस करून प्रयोगशाळेत एकामागून एक प्रयोग करीत असे; पण प्रत्येकवेळी अपयश त्याच्या मानगुटीवर बसलेले असे.

अपयशांच्या चक्रव्यूहात तो आणखी अडकत असे. अशा परिस्थितीत एक वर्ष निघून गेले; पण यशाचा धूसर किरणसुद्धा त्याच्या द़ृष्टीस पडत नव्हता. त्यामुळे एडिसनचे सहकारी कंटाळले होते. अशाही स्थितीत एडिसन मात्र थकला नव्हता की त्याने माघार घेतली नव्हती. उलट नव्या उत्साहाने तो कामाला लागला. तो रोज पहाटे उठत असे आणि उत्साहाच्या भरात एखाद्या नव्या कल्पनेने प्रयोगशाळेत येत असे. त्याचा अपार उत्साह आणि काम करण्याची उदंड शक्ती पाहून त्याचे सहकारीसुद्धा कसलीही कुरबूर न करता कामाला लागत. कितीही प्रयोग केले तरी पुढ्यात यशाऐवजी अपयशच हजर असते, असे एडिसनच्या सहकार्‍यांना वाटत होते. त्यामुळे आपण या प्रयोगांचा नाद सोडून दुसर्‍या एका नव्या प्रयोगाकडे वळावे असे त्यांना वाटत असे; मात्र याबाबत एडिसनला स्पष्टपणे सांगण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. अशा द्विधा मनःस्थितीत तीन वर्षे निघून गेली होती.

संबंधित बातम्या

एक दिवस एडिसनचे सर्व सहकारी एकवटले आणि त्यांनी एडिसनला सांगितले, साहेब आता बस्स झाले….! आतापर्यंत आपण 499 प्रयोग केले; पण जराही यश आले नाही. तेव्हा आम्हाला वाटते की, हा प्रयोग सोडून द्यावा आणि दुसर्‍या एखाद्या कार्यात लक्ष गुंतवावे. तुम्ही रोज नव्या उत्साहाने येता, कामाला लागता आणि निराश होऊन घरी जाता! आपण कदाचित निराश झाला, तरी निरुत्साही होत नसाल; पण आम्ही मात्र थकलो आहोत.

एडिसनने सहकार्‍यांचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि ते उत्साहाने म्हणाले, मित्रांनो, थोडा तरी विचार करा! अपयशाचे किती किनारे ओलांडून आपण इथपर्यंत आलो आहोत. आता यश अगदी आपल्याजवळ येऊन ठेपले आहे. आणखी अधिक उत्साहाने आपण कामाला लागलो तर…. ? एडिसन यांना मध्येच थांबवून सारे सहकारी एका सुरात ओरडले. हे चौथे वर्ष सुरू झाले आहे. याला काही अंत आहे की नाही? त्यावर जराही विचलित न होता एडिसन त्यांना शांतपणे म्हणाला, ‘हे पाहा, प्रत्येक वर्ष, त्यातील प्रत्येक दिवस आणि त्या दिवसाचा प्रत्येक प्रयोग महत्त्वाचा असतो. कारण, आपले प्रत्येक अपयश आपल्या यशाच्या अधिक जवळ येत असते. समजा, पाचशेव्या प्रयत्नाला यश येणार असेल, तर त्याआधीचे 499 प्रयोग आपण करून चुकलो आहोत, म्हणजे आता केवळ एक प्रयोग करायचा तेवढा शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा जोरकस प्रयत्न करा आणि जवळ येणार्‍या यशाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! एडिसनचे हे उत्तर ऐकून त्याचे सहकारी चकित झाले आणि त्याच्या जिद्दीला सलाम करीत नव्या जोमाने कामाला लागले. हा पाचशेवा यशस्वी झालेला प्रयोग म्हणजेच संपूर्ण जग प्रकाशमान करणार्‍या विद्युत दिव्याचा शोध होय! एडिसनचे वरील उद्गार हे स्पर्धा परीक्षा देणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याची चिकित्सक वृत्ती, आत्मबल आणि संयमाची परीक्षा घेणारे, न थकता नवीन उत्साहाने परीक्षेचा अभ्यास करण्यास प्रेरित करणारे एक अमूल्य टॉनिक आहे.

– देविदास लांजेवार

Back to top button