

शिक्रापूर (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांचे व्यवस्थापक व व्यावसायिक यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नीलेश महादेव दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरूर) व अफसर शेख अशी आरोपींची नावे आहेत. नीलेश दरेकर हा कंपन्यांच्या संचालकांना मी मानव विकास परिषद या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे तसेच आमचे राष्ट्रीय नेते अफसर शेख हे आहेत.
आमच्याकडे तुमच्या कंपन्यांबाबत भरपूर तक्रार अर्ज आले आहेत, तुम्ही मला तुमच्या कंपन्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट द्या; अन्यथा दरमहा पैसे द्या, नाहीतर तुम्हाला जिवे मारीन किंवा तुमच्या स्टाफचे हातपाय मोडून टाकीन. तसेच ग्रामपंचायत, पीएमआरडीए, प्रदूषण नियंत्रण बोर्ड, फायर डिपार्टमेंट यांच्याकडे आमच्या संस्थेमार्फत तक्रार अर्ज करून त्रास देऊ. पीएमआरडीए कार्यालयासमोर उपोषण करू, अशी धमकी देत खंडणीची मागणी केली. याबाबत सणसवाडी येथील अॅक्टिव्ह क्रोमवेल एक्झोट कंपनीचे एचआर प्रवीण बडदे यांनी शिक्रापूर पोलिसांना तक्रार दिली.
यझाता इस्टेट प्रोजेक्ट कंपनीचे मालक इराज फरीदानी यांना देखील जरी माझ्या कामाचे कोटेशन जास्त असले तरी मला कॉन्ट्रॅक्ट द्या, नाहीतर महाराष्ट्रभर आंदोलन करेन आणि तुम्हाला जिवे मारीन, अशी धमकी दरेकरने दिली. यामुळे फरीदानी यांनी देखील पोलिसांत तक्रार दिली. यातील आरोपी नीलेश दरेकर याला पोलिसांनी अटक केली असून, अफसर शेख याचा शोध घेत आहेत. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल खटावकर करीत आहेत.