नाशिक : चांदवडला लोकअदालतीत तीन कोटी ३९ लाखांची वसुली | पुढारी

नाशिक : चांदवडला लोकअदालतीत तीन कोटी ३९ लाखांची वसुली

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत न्याय चौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण २४१४ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन तीन कोटी ३९ लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश पी. बी. जोशी, सहदिवाणी न्यायाधीश एस. बी. माने यांनी दिली.

राष्ट्रीय लोकन्यायालयात दोन पॅनल ठेवण्यात आले. पॅनल नंबर १ मध्ये चांदवड तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. बी. जोशी व पॅनल नंबर २ मध्ये सहदिवाणी न्यायाधीश एस. बी. माने यांनी काम पाहिले. पॅनल मेंबर म्हणून ॲड. एस. एन. पानसरे, ॲड. एस. व्ही. घुले या विधिज्ञांनी काम पाहिले. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकूण ५६३ दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकन्यायालयात दंडरूपाने व बँकांकडून एक कोटी ७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच ६७५३ प्रिलिटीगेशन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये २३५९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ग्रामपंचायतीच्या ४८०८, एमएसईबीचे २, बँका आणि पतसंस्था यांचे ५६ प्रकरणे होती. तडजोडीतून एक कोटी ९८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायचौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण २४१४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, एकूण ३ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. लोकन्यायालयासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी. एन. ठाकरे, उपाध्यक्ष ॲड. बी. जी. पटेल, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. के. एल. पाटणी आदींसह वकील संघाचे सदस्य, सहायक सरकारी अभियोक्ता जगदीश पाटील, तालुका विधी सेवा समितीचे सहा. अधीक्षक एस. व्ही. घुले, यु. एच. कोळी, ए. एन. लभडे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, पीएलव्ही आणि पक्षकार उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button