पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेटची स्टार फलंदाज स्मृती मानधनाला (Smriti Mandhana) महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राच्या लिलावात तिच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले. 50 लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरलेल्या स्मृतीला आरसीबीने 3.40 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात सामील करून घेतले. मानधनाला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात चुरशीची लढत झाली पण शेवटी आरसीबीने बाजी मारली.
मानधना (Smriti Mandhana) ही भारतीय महिला क्रिकेट स्टार आहे. गेल्या काही वर्षांत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. ती कुमार संगकारा आणि मॅथ्यू हेडन यांना आदर्श मानते. स्मृतीची फलंदाजी ही दोन दिग्गज खेळाडूंच्या शैलीचे मिश्रण असल्याचे मानले जाते.
मानधना (Smriti Mandhana) तिच्या पॉवर गेमसाठी ओळखली जाते. 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या मानधनाने भारतासाठी 4 कसोटी, 77 एकदिवसीय आणि 112 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने अनुक्रमे 325, 3,073 आणि 2,651 धावा केल्या आहेत. बिग बॅश लीग, वुमन्स हंड्रेड यासारख्या लीगमध्येही तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. गतवर्षी वुमन्स हंड्रेड स्पर्धेत तिने 200 हून अधिक धावा चोपल्या होत्या.