नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम | पुढारी

नाशिक : शेतकर्‍यांचा महावितरणला अल्टिमेटम

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 11) तालुक्यातील औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर तब्बल दीड तास रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान शेतकर्‍यांनी सोमवार (दि.13) पर्यंत जीर्ण वीजवाहक तारांच्या दुरुस्तीसह सुरळीत वीज पुरवठ्याबाबत महावितरण कंपनीला अल्टिमेटम दिला आहे.

तालुक्यातील द्याने येथील शेतीशिवारात गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी सुरेखा भरत कापडणीस (गट क्रमांक 160) व गौरव भरत कापडणीस (गट क्रमांक 162) यांच्या 10 एकरांतील उसाच्या शेतात जीर्ण झालेली उच्च दाबाच्या वीजवाहक तारा तुटून पडल्याने शेतातील चार एकर ऊस जळून खाक झाला. गावातील नागरिकांनी धाव घेत आग शमविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याने उर्वरित क्षेत्रातील ऊस हा आगीच्या रौद्ररूपातून वाचविण्यात यश आले. याच परिसरात मागील आठवड्यात रोहित्रावरील उच्च दाबाची जीर्ण झालेली तार तुटली होती. त्यावेळी कांदा पिकांना पाणी देत असताना शेतकरी महेंद्र धर्मा कापडणीस हे थोडक्यात बचावले होते. महावितरण कंपनीला वारंवार जीर्ण वीजवाहक तारांबाबत माहिती देऊनही डोळेझाक होत असल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण कंपनीच्या निष्कळजीपणामुळे ऊस जळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेऊन थेट औरंगाबाद – अहवा राज्य महामार्गावरील राजपूर पांडे फाट्यावर आंदोलन केले. दरम्यान जायखेडा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी हे फौजफाट्यासह तत्काळ दाखल झाले. महावितरण कंपनीचे अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. दरम्यान महावितरण कंपनीचे अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. तेव्हा पारधी यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 13) पर्यंत जीर्ण वीजवाहक तारा बदलण्याठी कंपनीला अल्टिमेटम देत तूर्तास आंदोलन मागे घेतले. आंदोलनात मधुकर कापडणीस, तुषार कापडणीस, शैलेंद्र कापडणीस, सतिष कापडणीस, श्रीकृष्ण कापडणीस, सुपनराव कापडणीस, निंबा कापडणीस, शांताराम कापडणीस, नानाजी कापडणीस, सचिन कापडणीस, दिलीप कापडणीस, राहुल कापडणीस, महेंद्र कापडणीस, दयाराम कापडणीस, मंगेश कापडणीस, गोपाळ कापडणीस, गणेश कापडणीस, सचिन नामदेव कापडणीस, दिनेश कापडणीस, संदीप कापडणीस आदी सहभागी होते.

वायरमनची अरेरावी…
या परिसरात धोकादायक ठरत असलेले विजेचे खांब तसेच जीर्ण वीजवाहक तारा कधी कोसळून अपघात होईल, याची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळे वायरमनला दुरुस्तीसह सुरळीत वीजपुरवठ्याबाबत विचारणा केल्यास अरेरावीची भाषा करतात, असा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. आंदोलनावेळी संबधित लाइनमनला यामुळेच शेतकर्‍यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान वायरमन कधीही वर्दीत दिसत नसल्याने यावर कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

Back to top button