प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
अंधारामध्ये प्रकाशाची लेणी कोरत बसलेल्या एखाद्या महान कलावंताने आपल्या प्रतिभेच्या स्वरचाफ्याने अत्यंत अपूर्व असा आविष्कार घडवावा, असा आविष्कार राजा बढे यांनी आपल्या 'महाराष्ट्र गीता'तून घडविला आहे. अज्ञातदासाच्या पोवाड्यापासून सावरकरांच्या 'जयोस्तुते…'पर्यंत महाराष्ट्राच्या वीरश्रीयुक्त काव्यप्रतिभेने जो आलेख तयार केला त्याचा पुढचा बिंदू राजा बढे यांनी या गीतात गाठला.
काव्य म्हणजे सहजस्फूर्त भावनांचा उत्कट आविष्कार असतो; विशेषत: उत्तुंग प्रतिभाशक्ती, रोमांचकारी देशभक्ती, स्फुल्लिंग चेतवणार्या काव्याचे विशिष्ट असे अद्भुत वैशिष्ट्य असते, वेगळेपण असते. राजा बढे यांनी साकारलेल्या महाराष्ट्र गीताचेसुद्धा आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचे झाले, तर अंधारामध्ये प्रकाशाची लेणी कोरत बसलेल्या एखाद्या महान कलावंताने आपल्या प्रतिभेच्या स्वरचाफ्याने अत्यंत अपूर्व असा आविष्कार घडवावा, असा आविष्कार राजा बढे यांनी आपल्या 'महाराष्ट्र गीता'तून घडविला आहे. दिलेला शब्द पाळणारा, अपमान सहन न करणारा आणि जर कोणी अपमान केला, तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा रोखठोक अस्मिता असलेला माणूस म्हणजे मराठी माणूस. हे वर्णन सर यदुनाथ सरकार यांनी 'शिवाजी आणि शिवकाल' या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात मराठी माणसाची वैशिष्ट्ये सांगताना केले आहे.
चिनी प्रवासी ह्युएन त्सेंगाने म्हटले होते की, दक्षिणेत 'मोहलिश्य' म्हणजे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचा मराठी माणूस हा मोठा कणखर आहे. तो राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे, अस्मितेचे आणि वैभवाचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. महाराष्ट्राचे हे वर्णन पुढे राष्ट्रकुट राजांनी सिद्ध केले. राजा बढे यांनी महाराष्ट्राच्या घडणीचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्या काव्यामध्ये विलोभनीय द़ृष्टीने वर्णन केला. महाराष्ट्रावर अस्मानी-सुलतानी आक्रमणे झाली. या आक्रमणांतून आता देश कसा वाचेल, असे वाटत होते त्यावेळी सह्याद्रीच्या छाव्यांनी स्वातंत्र्याचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी बलाढ्य शत्रूंशी अनेक लढाया केल्या आणि स्वराज्याचे तोरण बांधले. हा सारा इतिहास प्रभावीपणे महाराष्ट्र गीतात आलेला आहे.
राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी होते. रुबाबदार, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी मनात देशभक्तीचा स्फुल्लिंग सांभाळणारा होता. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता बढे यांच्यात असली, तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचे भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसते. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्र गीत म्हणजे बढे यांच्या काव्य प्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. यानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका 'एचएमव्ही' कंपनीने तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुद्रापार पोहोचवली. राज्याच्या उभारणीनंतर तब्बल 67 वर्षांनी हे गीत राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
देशभराचा विचार करता ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी अशा 12 राज्यांनी आपापली राज्यगीते तयार केली आहेत. काही राज्ये राज्यगीते तयार करण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व गीतांमधील रचना, मांडणी, अद्भुत आशय आणि वीररसाचा आविष्कार कुठल्या गीतामध्ये झाला असेल, तर तो पहिल्या क्रमांकाने महाराष्ट्र गीतालाच द्यावा लागेल.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।
जय जय महाराष्ट्र माझा… ॥1॥
या गीतामधील पहिल्या कडव्यामध्ये विलक्षण असा आशय आलेला आहे. या आशयामध्ये महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक इतिहास प्रभावीपणे मांडलेला आहे. महाराष्ट्रातील रेवा, वरदा, कृष्णा, कोयना या सार्या नद्या एकत्वाचे पाणी एकत्र भरत आहेत. महाराष्ट्राचे ऐक्य आजवर इतिहासाने ज्या पद्धतीने भक्कम केलेले आहे ते ऐक्य भूतकाळात, वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात तसेच अखंड राहील, याची ग्वाही कवींनी पहिल्याच कडव्यात दिलेली आहे. पुढील कडवी महाराष्ट्राच्या इतिहासाचा कळस गाठणारी आहेत; मग महाराष्ट्राचे छावे कशा पद्धतीने लढले याचा इतिहास भीमथडीच्या तट्टांनाही दाखविले यमुनेचे पाणी या स्वरूपामध्ये प्रकट केलेला आहे. मराठ्यांनी अटकेपार भगवा रोवला, याचा इतिहास त्यांनी दोन ओळींमध्ये मांडलेला आहे.
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥2॥
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे वर्णन विलक्षण पद्धतीने केलेले आहे. पहाडावर, पाषाणावर लेणी ज्या पद्धतीने कोरल्या जातात, तसाच छातीचा कोट करून महाराष्ट्रातील वीरांनी या इतिहासाची लेणी कोरलेली आहेत, असे कवींनी सांगितले आहे. 'दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा' या ओळीने या काव्याची सांगता करून महाराष्ट्राचे अखिल भारतातील महत्त्व राजाभाऊंनी उद्धृत केले आहे.
असे अद्भुत महाराष्ट्र गीत महाराष्ट्र संस्कृतीचा आस्वाद प्रकट करणारे आहे. कवीचे इतिहासाचे आकलन आणि महाराष्ट्र संस्कृतीचे आकलन, अध्ययन हे रोमांचक आहे. सांस्कृतिक अनुभव हा काव्यात्मक माध्यमातून प्रकट होताना त्यातील जिवंतपणा हा विशेष महत्त्वाचा असतो. सलगता आणि अखंडता जर उत्स्फूर्त असेल आणि ती हृदयाला भिडणारी असेल तेव्हा ती अधिक वस्तुनिष्ठ आणि सत्याच्या समीप जाणारी असते. राजा बढे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांकृतिक जीवनाची घुसळण अनुभवली आहे. ती त्यांनी यथार्थपणे प्रकट केली आहे. कमीत कमी शब्दांत अधिकाधिक प्रभावी अभिव्यक्ती हे वीररसपूर्ण काव्याचे एक आगळे वैशिष्ट्य असते. अज्ञातदासाच्या पोवाड्यापासून स्वा. सावरकरांच्या 'जयोस्तुते…'पर्यंत महाराष्ट्राच्या वीरश्रीयुक्त काव्यप्रतिभेने जो आलेख तयार केला त्याचा पुढचा बिंदू राजा बढे यांनी या गीतात गाठला.
कुठल्याही राज्य गीताचे यश हे त्यातील उत्कट व श्रेष्ठ अभिव्यक्तीवर अवलंबून असते. विश्वसाहित्यातील राज्यगीताची वैशिष्ट्ये सांगताना असे म्हटले जाते की, उत्कट अभिव्यक्ती, इतिहासाचा यथार्थ व सार्थ गौरव आणि अभिमान, हर्ष व आनंदाचे क्षण, ऐतिहासिक घटनांचे काव्यमय आविष्करण तसेच अभिमान आणि अस्मितेचा शोध या घटकावर कुठलेही राज्यगीत यशस्वी ठरते. या घटकांचे प्रतिबिंब अचूकपणाने आणि मार्मिकतेने उमटते तेव्हा ते राज्यगीत अधिक प्रभावशाली ठरते.
या गीतातील प्रत्येक कडव्यामध्ये उत्तम प्रकारे अनुप्रास साधलेला आहे. तसेच उपमा, उत्पे—क्षा, श्लेष इत्यादी अलंकारांची उत्तम प्रकारे उधळण केली आहे. विशेषत:, कवी राजा बढे यांच्या उपमा अर्थपूर्ण आहेत. 'सह्याद्रीचा सिंह' असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधले आहे; तर एकत्वाचे पाणी ही उपमा समर्पक आहे. मातीच्या घागरी या पाण्याने भरल्या जात आहेत, हीसुद्धा उपमा अर्थपूर्ण आहे. अशाप्रकारे प्रत्येक कडव्यात काही ना काही तरी सुयोग्य अशा उपमेचा उपयोग केला आहे. तुतारीच्या गगनभेदी सुरांनी हे गीत सुरू होते आणि अंतिम टप्प्यावर जेव्हा ते पोहोचते तेव्हा ऐकणार्याच्या रोमारोमांत महाराष्ट्राचा अभिमान संचारण्याचे सामर्थ्य या पोवाड्यात आहे. गीतामध्ये मराठ्यांच्या युद्ध मोहिमांचे हुबेहूब चित्र रंगवले आहे. त्यामध्ये त्यांनी नभांचा गडगडाट, अस्मानी-सुलतानी संकट आणि भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी अशी प्रतीके वापरून मराठ्यांच्या यशस्वी मोहिमांचे रोमांचित चित्र उभे केले आहे.