शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार | पुढारी

शिवाजी महाराजांचा तब्बल 61 फुटी पुतळा नाशिकमध्ये घेतोय आकार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ याची साक्ष देणारा ६१ फुटी भव्य दिव्य पुतळा अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून साकारला जात आहे. शिवजन्मोत्सवापर्यंत महाराजांचे हे भव्य रूप शिवभक्तांना बघता येईल, तसेच या पुतळ्याची जागतिक स्तरावर नोंद करण्याचा मंडळाचा मानस आहे.

या पुतळ्याचे काम गेल्या नवरात्रापासून सुरू होते. मात्र, शाॅर्टसर्किट झाल्याने पूर्णत्वापर्यंत आलेल्या पुतळ्याचे मोठे नुकसान झाले. अशातही हार न मानता जिद्दीने गेल्या २९ जानेवारीपासून पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले असून, शिवजन्मोत्सवापर्यंत महाराजांचे हे भव्य रूप शिवभक्तांना बघता येईल, असा कारागिरांना विश्वास आहे.

२० फूट झगा तर ३५ फुटी तलवार

शिवजन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६१ फुटी भव्य पुतळा अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळातर्फे साकारला जात आहे. कमरेपर्यंत २५ फुट, पाय १५ फूट, २० फूट झगा तर ३५ फुटी तलवार साकारण्यात येत आहे. प्रसिद्ध मूर्तिकार हितेश बापू पाटोळे हे अवघ्या १५ दिवसांत मुर्तीकाम पूर्ण करणार आहेत. शिवजन्मोत्सवापर्यंत महाराजांचा हा भव्य पुतळा आकारास येईल, असा विश्वास मूर्तिकारांनी व्यक्त केला. ही मूर्ती २ दिवस अशोक स्तंभ, तर ३ दिवस डोंगरे वसतिृह मैदानावर नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

छाया-हेमंत घोरपडे

आजपर्यंत शिवाजी महाराजांची अशी भव्य मूर्ती कुणीही कुठेही बनवलेली नाही. या मूर्तीचे काम सुरु असून, शिवजन्मोत्सवापर्यंत महाराजांचा हा भव्य पुतळा आकारास येईल. मात्र, आत्तापासूनच मूर्ती पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी होते आहे.

वेंकटेश मोरे, संस्थापक( अशोक स्तंभ जन्मोत्सव मित्रमंडळ)

हेही वाचा :

Back to top button