लोणावळा : एक्स्प्रेस वे-वर 342 पोती गुटखा जप्त | पुढारी

लोणावळा : एक्स्प्रेस वे-वर 342 पोती गुटखा जप्त

लोणावळा : गुटखा विक्रीस बंदी असतानाही अवैधरित्या गुटखा वाहतूक करणार्‍या एका ट्रकवर संयुक्त कारवाई करीत लोणावळा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी 342 पोती गुटख्यासह एकूण 25 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहमंद खलील जमाल अहंमद शेख (वय 40 वर्षे, रा. लालगिरी, ता. बहामपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) आणि ट्रक क्लीनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे (वय 35 वर्षे, रा. खडखडगल्ली, बलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह ट्रकमालक सदाम ऊर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (रा. मुल्ला गल्ली, नरोना गुलबर्गा, कर्नाटक) याच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रक केला जप्त
कर्नाटक राज्यामधून पुणे बाजूकडून येणार्‍या ट्रकची (क्रमांक केए 32 एए 1138) पाहणी केली असता त्यामध्ये गुटख्याच्या पुड्यांनी भरलेली 342 पोती आढळून आली. अन्न व औषण प्रशासन यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार 10 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा 15 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 25 लाख 67 हजार 40 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, युवराज बनसोडे, हवालदार अंकुश नायकुडे, स्वप्निल अहिवळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेंडगे, सुभाष शिंदे, अंकुश पवार, अक्षय सुपे आदींनी केली.

एक्स्प्रेस वे-वर लावला सापळा
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीमध्ये कुसगाव (ता. मावळ) येथे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे-वर दोन टीम करून सापळा लावण्यात आला होता.

Back to top button