नाशिकच्या नोट प्रेसला नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट | पुढारी

नाशिकच्या नोट प्रेसला नेपाळच्या नोटा छापण्याचे कंत्राट

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील देश-विदेशाच्या चलनी नोटा छापणाऱ्या करन्सी नोट प्रेसला नेपाळचे हजाराच्या ४३० दशलक्ष नोटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. याच देशाच्या 50 रुपयांच्या ३०० दशलक्ष नोटा छापण्याचे वेगळे कंत्राटही प्रेसला मिळाले आहे. एकूण ७३० दशलक्ष नोटा छापण्याचा करार नेपाळबरोबर नुकताच झाला, अशी माहिती आयएसपी – सीएनपी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकाद्वारे दिली.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रांत रोजगार कमी झाला. कामगारांना वेतन मिळाले नाही, कामगार कपात झाली. नाशिकरोड प्रेसनेही कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या मंदीचा सामना करत जोमाने मार्गक्रमण सुरू केले आहे. मात्र, भारत सरकारने डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपया छापण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात केल्याने प्रेसपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. भविष्यातील डिजिटल रुपयामुळे बॅँकिंग आणि नोट प्रेस क्षेत्रातील रोजगारावर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन फक्त भारताच्याच नोटा छापण्यावर विसंबून न राहता, इतर छोट्या देशांच्या नोटांचे कंत्राट मिळवून व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधाव्यात, सिक्युरिटी फिचर्ससारखे अन्य उत्पादन करता येईल का, हे तपासून बघण्याची विनंती प्रेस मजदूर संघाने प्रेस व्यवस्थापनाला केली होती. त्याला व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नेपाळच्या नोटा छापण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याचे जगदीश गोडसे यांनी नमूद केले आहे. प्रेस आणि प्रेसकामगारांचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी वेळोवेळी योग्य, आवश्यक ती भूमिका प्रेस मजदूर संघ घेत आहे. पासपोर्ट, मुद्रांक, धनादेश, लीकर सील छापणा-या आयएसपी तसेच नोटा छापणा-या सीएनपी प्रेसच्या मशिनरीचे आधुनिकीकरण करण्याची मागणी मजदूर संघाने केली होती. त्यानुसार आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले आहे.

कामगारांमध्ये उत्साह अन‌् आनंद

नेपाळच्या नोटांबरोबरच भारताच्या एकूण ५ हजार ३०० दशलक्ष नोटा छपण्याचे मोठे कामही प्रेसला मिळाल्याने प्रेसमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. या सर्व नोटा एका वर्षात छापून द्यायच्या असून, कामगार त्यासाठी सज्ज झाले आहेत.

चीनला टाकले मागे

नाशिकरोड प्रेसने चीनसारख्या देशाला नोटांचे कंत्राट मिळण्याच्या स्पर्धेत मागे टाकून नेपाळचे एक हजार रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट मिळवले आहे हे विशेष. नेपाळच्या 50 च्या नोटा छपाईचे कामही चीन व फ्रान्सला मागे टाकून नाशिकरोड प्रेसने मिळवले आहे.

हेही वाचा :

Back to top button