कसब्यासाठी 9 जणांचे 14 अर्ज; आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार | पुढारी

कसब्यासाठी 9 जणांचे 14 अर्ज; आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसोबत इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष असे मिळून सोमवारी नऊ उमेदवारांनी 14 उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम मुदत आहे. कसबा पेठ मतदारसंघातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

त्यानुसार भाजपातर्फे हेमंत रासने यांनी चार उमेदवारी अर्ज दाखले केले असून, गणेश बीडकर यांनी भाजपातर्फे आपला अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे रवींद्र धंगेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. संभाजी बि्रग्रेडतर्फे अविनाश मोहिते, अखिल भारतीय सेनेतर्फे मिलिंद कांबळे, तर सलीम अब्दुल सय्यद, चंद्रकांत मोटे, महेश म्हस्के, अमोल याबेस तुजारे यांनी प्रत्येकी एक अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

शुक्रवारी (दि.3) दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले असून, सोमवारी सायंकाळपर्यंत 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे यांनी दिली. 8 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी, 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघार, 26 फेब्रुवारीला प्रत्यक्षात मतदान होणार आहे, तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती किसवे यांनी दिली.

16 नेत्यांचा उमेदवारीसाठी होता दावा
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या 16 नेत्यांनी उमेदवारीसाठी दावा सांगितला होता. या पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, आरपीआय युतीतर्फे भाजपने शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारीचीही सायंकाळपर्यंत घोषणा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, रविवारी दिवसभरात उमेदवार जाहीर झाला नव्हता.

Back to top button