नाशिक : ग्रामीण पोलिसांकडून पानटपरी चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरीचालकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यात १५ गुन्हे दाखल केले असून, पानटपरी चालकांकडून गुटखा, सिगारेट, तंबाखू, पानमसाला असा मुद्देमालही जप्त केला आहे.
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी असून, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासही बंदी आहे. मात्र, तरीदेखील हे नियम पानटपरी चालकांकडून पाळले जात नसल्याची बाब ग्रामीण पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी, पवारवाडी, चांदवड, आयेशानगर, त्र्यंबकेश्वर, रमजानपुरा, लासलगाव, सायखेडा व जायखेडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १५ पानटपरी चालकांनी कोटपा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना टपरीचालक आढळून आले. पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त केला आहे.
हेही वाचा :
- गोव्याची म्हादई वाचवा; अ. भा. मराठी साहित्य संमेलनात एकमताने ठराव मंजूर
- खेड : ठेकेदार अन् अधिकारी करतात तरी काय?
- शेवगाव : 27 गावांत राजकारण तापलं! ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या