खेड : ठेकेदार अन् अधिकारी करतात तरी काय? | पुढारी

खेड : ठेकेदार अन् अधिकारी करतात तरी काय?

खेड; पुढारी वृत्तसेवा : बारामती-अमरापूर राज्यमार्गाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले. या रस्त्याच्या संबंधित ठेकेदाराने अस्तरीकरणासह सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सुविधाही काही प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत. मात्र, या ठेकेदाराने आखोनी-खेड भीमा नदीपूल 10 किमीचे अंतिम अस्तरीकरण अद्यापि केले नसल्याने या राज्यमार्गावर मोठे खड्डे तयार होऊ लागले आहेत.

अनेक महिन्यांपासून या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने ठेकेदाराने अस्तरीकरण न करता कामाची रक्कम खाल्ली की काय?, अशी चर्चा नागरिक आणि वाहनचालक करत आहेत. ठेकेदार आणि अधिकारी करतात तरी काय?, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना अस्तरीकरणाबाबत विचारणा केली असता, यावर हातावर घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली जात आहे. मागील काही महिन्यांपासून खेड – भीमा नदीच्या पुलापर्यंत खोल जीवघेणे खड्डे पडले आहेत.

या खड्ड्याचा वाहन चालकांना अंदाज न आल्याने अपघात घडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले; मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचे केवळ खड्डे बुजवून मलमपट्टीने समाधान करायचे आहे का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नियोजित रकमेची तरतूद आहे. मात्र, अद्याप अंतिम अस्तरीकरण बाकी असल्याने संबंधित ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

Back to top button