शेवगाव : 27 गावांत राजकारण तापलं! ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या | पुढारी

शेवगाव : 27 गावांत राजकारण तापलं! ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या

रमेश चौधरी

शेवगाव : यंदा 27 ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्याने गावकीचे राजकारण आतापासूनच तापू लागल्याचे दिसते. त्यात ऐरवी कधीही वळून न पाहणारे, आता ठोकून राम राम घालत असल्याने निवडणुका जवळ आल्याची ही चाहूल समजली जाऊ लागली आहे.
जानेवारीच्या सुरूवातील मुदत संपलेल्या पाच व अखेरीस मुदत संपलेल्या चार अशा नऊ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणुका नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कि वेळेत, याबाबत संभ्रम असला तरी तेथील इच्छुक गाव पुढार्‍यांचा राम राम सुरू झाला आहे. निवडणुक आयोगाने 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीची माहिती घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली होती. तत्पुर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

शेवगाव तालुक्यात या कालावधीत अमरापुर, दहिगाव ने, भायगाव, जोहरापुर, खामगाव, खानापुर, प्रभुवाडगाव, रांजनी, सुलतानपुर खु, वाघोली,आखेगाव ग्रामपंचयतीच्या मुदती संपल्याने तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर 18 डिसेंबरला या 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या व 20 डिसेंबरला मतमोजणी निकालात नुतन पदाधिकारी निवडले गेले. तर 29 डिसेंबरला उपसरपंचाची निवड होऊन येथील प्रशासकराज संपुष्टात आले होते.

आता 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 मध्ये मुदत संपार्‍या ग्रामपंचायतींची माहिती निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. या कालावधीत 27 ग्रामपंचायतीच्या मुदती संपत आहेत. पैकी 5 जानेवारीला मुदत संपलेल्या बालमटाकळी, ढोरसडे, खरडगाव, भगुर, बोधेगाव अशा पाच ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जानेवारी अखेरीस मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये हिंगणगाव- डी.बी.शेळके, विस्तार अधिकारी पं.स, कर्‍हेटाकळी – एस.एस.भोंग, विस्तार अधिकारी पं.स, वरुर बु – डी.बी. शेळके, विस्तार अधिकारी पं.स, मुंगी – सचिन भाकरे, सांख्यिकी विस्तार अधिकारी पं.स. यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मे महिन्याच्या अखेरीस देवटाकळी, थाटे, वडूले खु, एरंडगाव समसुद, जुन महिन्यात वडुले बु, ऑगस्ट महिन्यात लोळेगाव, सामनगाव, खडके, मडके, लाडजळगाव, आव्हाणे बु, बर्‍हाणपृर, दिवटे, शेकटे खु, गोळेगाव, ऑक्टोबर महिन्यात एरंडगाव भागवत, लाखेफळ अशा 17 ग्रामपंचायतीच्या मुदती संपणार आहेत.

निवडणुकांबाबत संभ्रम कायम
गत एक-दोन वर्षापासून नगरपरिषदा व जिल्हा परिषदा यांची मुदत संपली असताना त्या निवडणुका होणे बाकी आहे. कदाचित या निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्यास ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात. मात्र सदर निवडणुका पुढे ढकलल्यास ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात. याबाबत सध्यातरी संभ्रम अवस्था असल्याने मुदत संपलेल्या व संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या गावात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. येथील इच्छुक मतदारांचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत असून राजकीय जुळवाजुळवीच्या तयारीला लागले आहेत.

Back to top button