नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला 'ग्रीन सिग्नल', रेल्वे मंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता | पुढारी

नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला 'ग्रीन सिग्नल', रेल्वे मंत्र्यांकडून तत्त्वत: मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनाच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रविवारी (दि. 5) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे लवकरच नाशिक-पुणे रेल्वे प्रवास जलद आणि सुखकर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट करीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहे. तसेच या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर केंद्र शासनाच्या मंजुरीमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता रेल्वे मंत्र्यालयाने तत्त्वत: मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी १ हजार ४५० हेक्टरपैकी ३० हेक्टरहून अधिक खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सरकारी आणि वनजमीन संपादनाचीही प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली. तसेच याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी स्वत:च्या टि्वटर हॅण्डलवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये रेल्वेमंत्रीही दिसत असून, तेदेखील या प्रकल्पाला दुजोरा देतात.

दरम्यान, पुणे-नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी कल्याण किंवा मनमाडमार्गे रेल्वे गाठावी लागते. यास बराच विलंब लागत असून, प्रवासही खर्चिक होतो. अशात हा मार्ग पूर्णत्वास आल्यास नाशिककर आणि पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतूक करण्यासाठीही मोठी सुविधा मिळणार आहे. यातून दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळेल.

दृष्टिपथात प्रकल्प

– राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रकल्पाला चालना
– १६ हजार कोटींचा प्रकल्प; २३५ किमी लांबीचा रेल्वेमार्ग

– नाशिक-अहमदनगर-पुणे जिल्ह्यांना जोडणार
– २०० किमी प्रतितास वेगाची क्षमता

– नाशिक ते पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत

– नाशिक-पुणेदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित

– भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी मार्गाचे काम

नाशिककरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाबाबत अनेकांनी चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून जमीन अधिग्रहण असो वा रेल्वे मंत्रालयाच्या विविध शंकांचे निरसन असो यासर्व बाबी लीलया पार पाडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला मूर्त स्वरूप आले.

– प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ता, भाजप

हेही वाचा :

Back to top button