नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरू झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यात अनेक अडचणी येत आहेत. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत.
भुजबळ न्यायालयात सुनावणीवेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ तसेच विशेष सरकारी वकील यांच्याशी चर्चा केली आणि समन्वयाने मार्ग काढावा, अशी विनंती केली. भिडे वाड्यातील दुकानदार आणि मकानदारांना पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने हवी आहेत आणि त्यांना त्याच ठिकाणी दुकाने देऊन वरती शाळा आणि स्मारक करणार आहोत. गाळेधारक आता याचिका मागे घेण्यास तयार आहेत, मात्र पुणे महापालिकेने यात ठोस पावले उचलून त्यांना लेखी आश्वासन द्यायला हवे, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
भुजबळ यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशीदेखील चर्चा केली. भिडे वाड्यासंदर्भातील सुनावणीत काही दिवसांपूर्वी याच जागेत शाळा असल्याचे पुरावे अपीलकर्त्यांच्या वकिलांकडून मागण्यात आले होते. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, जानेवारी १८४८ साली भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा होती. याचे अनेक पुरावे आम्ही उपलब्ध केले आहेत. यातले अनेक पुरावे हे कोल्हापूर विद्यापीठातील ऐतिहासिक नोंदी असलेल्या पुराभिलेखमध्ये उपलब्ध आहेत तेदेखील आम्ही कोर्टासमोर मांडू मात्र दुकानदार जर कोर्टाबाहेरच समन्वयाने यात तोडगा काढण्यास तयार असतील तर राज्य सरकारने त्यांना प्रतिसाद देऊन यात लक्ष घातले पाहिजे.
हेही वाचा :