जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन | पुढारी

जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील टॉवर चौकातील मार्केटमध्ये व्यापारी गाळयासमोरील मोकळ्या जागेत दुकान लावण्यावरून व्यापारी आणि फुटपाथ विक्रेत्यामध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारी झाले. व्यापारी दुकानदाराला मारहाणीच्या निषेधार्थ फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारण्यात येवून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले.

जळगाव शहरात महापालिकेच्या मालकीचे १५ ते १८ व्यापारी संकुले आहेत. यापैकी बऱ्याच व्यापारी संकुलांमध्ये बरेच गाळेधारकांनी दुकानालगतच्या वा पुढच्या भागातील मोकळया जागा भाडयाने वा काही मोबदल्यात दिल्या आहेत. कोरोना काळात तसेच त्याअगोदरसुद्धा बऱ्याच वेळा मनपा प्रशासनाकडून बऱ्याच ठिकाणी भाजी विक्रेत्यांसह अन्य वस्तू विक्रेत्यांना जागा निश्चीत करून देण्यात आल्या आहेत. असे असले तरी विक्रेत्यांच्या थेट रस्त्यावरच भाजीबाजार मांडण्याच्या अट्टहासाने वाहन कोंडीसह अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर दुसरीकडे मनपाच्या व्यापारी संकुलांमध्ये गाळेधारकांनीच दुकानापुढील मोकळया जागेत भाडेतत्वावर वा रोजाने जागा देण्यात आल्या आहेत.

दुकान थाटण्यावरून झाला वाद…
या फूटपाथ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंग ओढवले आहेत. याचाच प्रत्यय आज सकाळी महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमध्ये पहावयास मिळाला. यात फुटपाथ विक्रेता व दुकानदार यांच्यात दुकान थाटण्यावरून शाब्दिक वाद होऊन प्रकरण हाणामारीवर गेले. याची परिणती महात्मा फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारून मनपा इमारतीसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

आयुक्त नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव…
गुरूवारी सकाळी टॉवर चौकातील मार्केटमध्ये व्यापारी गाळयासमोरील मोकळया जागेत दुकान लावण्यावरून व्यापारी आणि फूटपाथवरील विक्रेत्यामधील वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मनपावर हल्लाबोल केला. परंतु मनपा प्रशासनाचे आयुक्त वा उपायुक्त त्यावेळी उपस्थित नसल्याने बराच वेळ व्यापाऱ्यांकडून प्रशासकीय इमारतीच्या आवारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुपारी तीन वाजेपर्यंत प्रशासनाकडून कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने अखेर व्यापाऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

हेही वाचा:

Back to top button