नाशिक : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणीला माथाडींचा लाक्षणिक संप | पुढारी

नाशिक : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणीला माथाडींचा लाक्षणिक संप

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्याबरोबरच अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने आज लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मागण्यांसंदर्भात शासनाला विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वणी शाखेच्या वतीने माथाडी कामगार यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. वणी उपबाजार समितीच्या आवारात धरणे सुरू करण्यात आले. माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाकडे वेळोवेळी संप, मोर्चे, आंदोलने केली. मात्र यासंदर्भात संयुक्त बैठका घेऊनही अद्याप कामगारांच्या गंभीर प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. प्रलंबित प्रश्नांमध्ये माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व पुनर्रचित सल्लागार समितीवर कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करणे, विविध माथाडी मंडळांची पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे, माथाडी कामगारांवर दहशत करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे, पोलिस संरक्षणाचे नवीन परिपत्रक पोलिस यंत्रणेकडून काढण्यासंबंधी कार्यवाही होणे आदींचा समावेश आहे. आजच्या संपामध्ये शेतकरी संघर्ष समिती, वणी ग्रामपंचायत, शेतमजूर संघटना अशा अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मागण्यांचे निवेदन वणीचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांना देण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button