मोशीचे अग्निशमन केंद्र पार्किंगचा अड्डा; दुर्घटना घडल्यास नजीकचे केंद्र मात्र बंद | पुढारी

मोशीचे अग्निशमन केंद्र पार्किंगचा अड्डा; दुर्घटना घडल्यास नजीकचे केंद्र मात्र बंद

मोशी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मोशी येथील नागेश्वर महाराज अग्निशमन केंद्राच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही का? असा सवाल मोशी ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. हे केंद्र अद्याप सुरू न झाल्याने या जागेचा वापर वाहन पार्क करण्यासाठी होताना दिसून येत आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
नजीकच्या सोसायट्यांचा गाड्या या ठिकाणी रात्रभर पार्क केलेल्या असतात. त्याचबरोबर हॉटेल व खरेदीसाठी आलेल्या गाड्यादेखील येथे उभ्या केलेल्या दिसून येतात. अग्निशमन केंद्र बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून मोशी, डुडुळगाव हद्दीत दुसरे अग्निशमन केंद्र नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडी आक्रमक
याबाबत महाविकास आघाडी अधिक आक्रमक झाली असून, हे केंद्र तात्काळ सुरू केले जावे, अशी मागणी होत आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्राहक सेलचे शहर कार्याध्यक्ष गणेश साहेबराव सस्ते यांनी सांगितले, की गेल्या अनेक महिन्यांपासून अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनाअभावी इतके दिवस ते बंद का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका प्रशासनाची डोळेझाक
अवघ्या पंधरा दिवसांवर मोशी गावची यात्रा आली आहे. तत्पूर्वी तरी पालिकेने हे केंद्र सुरू करावे, एखादी घटना घडल्यास सध्या चिखली आणि प्राधिकरणातून अग्निशामक गाड्या बोलावण्याशिवाय मोशीला पर्याय नसतो. ही गंभीर समस्या आहे. मात्र, पालिका याकडे डोळेझाक करत आहे.

Back to top button